महापालिकेच्या ३९६ नव्या बालवाड्या सुरू होणार - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

14 September 2018

महापालिकेच्या ३९६ नव्या बालवाड्या सुरू होणार


मुंबई - मुंबई महापालिकेच्या शाळांच्या तुलनेत बालवाड्यांची संख्या कमी असल्याने मुले खाजगी बालवाड्यांकडे वळतात. परिणामी, भविष्यातील शाळांच्या प्रवेशावरही परिणाम होतो. ही बाब लक्षात घेऊन सध्याच्या ५०४ बालवाड्यांव्यतिरिक्त ३९६ बालवाड्या सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने सुरू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे महापालिकेच्या बालवाड्यांची एकूण पटक्षमता २७ हजार एवढी होणार असून, या बालवाड्यांमुळे विद्यार्थी गळती रोखण्यास मदत होणार आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (शहर) ए. एल. जऱ्हाड यांनी दिली.

नव्याने सुरू होणाऱ्या ३९६ बालवाड्यांमध्ये सर्वाधिक म्हणजे १३३ बालवाड्या या मराठी माध्यमाच्या आहेत. त्या खालोखाल ९२ बालवाड्या उर्दू माध्यमाच्या, ८७ बालवाड्या हिंदी माध्यमाच्या, २५ बालवाड्या गुजराती माध्यमाच्या, २३ बालवाड्या इंग्रजी माध्यमाच्या असणार आहेत. या खालोखाल कन्नड व तेलुगू भाषिक माध्यमांच्या प्रत्येकी १० बालवाड्या, तर तमिळ माध्यमाच्या ९ बालवाड्या असणार आहेत. या व्यतिरिक्त ६ बालवाड्या या 'सेमी इंग्रजी' माध्यमाच्या असणार असून, १ बालवाडी ही 'मुंबई पब्लिक स्कूल'अंतर्गत असणार आहे.नव्याने सुरू करण्यात येत असलेल्या ३९६ बालवाड्यांमध्ये सर्वाधिक म्हणजे ४४ बालवाड्या या 'एफ/उत्तर' विभागात असणार आहेत. ज्यामुळे 'एफ/उत्तर' विभागातील बालवाड्यांची एकूण संख्या ७६ होणार आहे. या खालोखाल 'एच/पूर्व' विभागात ३८ बालवाड्या सुरू होणार आहे. ज्यामुळे 'एच/पूर्व' विभागातील बालवाड्यांची संख्या ६० होणार आहे. तसेच 'पी/उत्तर' विभागात ३५ नव्या बालवाड्यांची सुरुवात होणार असल्याने त्या विभागातील बालवाड्यांची संख्या ५५ होणार आहे. यात विशेष बाब म्हणजे महापालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांपैकी दक्षिण मुंबईतील 'बी' व 'सी' या दोन विभागांमध्ये यापूर्वी महापालिकेच्या बालवाड्या नव्हत्या. मात्र, आता या दोन्ही विभागांमध्ये अनुक्रमे ५ व १२; याप्रमाणे एकूण १७ बालवाड्या पहिल्यांदाच सुरू होणार आहेत.या आधीपासून सुरू असलेल्या ५०४ बालवाड्यांमध्ये सर्वाधिक म्हणजे १९० बालवाड्या या मराठी माध्यमाच्या आहेत. त्याखालोखाल ११४ बालवाड्या हिंदी माध्यमाच्या, १०७ बालवाड्या उर्दू माध्यमाच्या, ६६ बालवाड्या इंग्रजी माध्यमाच्या, १० बालवाड्या तमिळ माध्यमाच्या आहेत. या खालोखाल गुजराती माध्यमाच्या ९, सेमी इंग्रजी ६, तर कन्नड व तेलुगू माध्यमाच्या प्रत्येकी १ बालवाड्या सध्या कार्यरत आहेत. या सर्व कार्यरत असलेल्या बालवाड्यांची पटक्षमता १५ हजार १२० एवढी आहे. सध्या महापालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांतर्गत सर्वाधिक म्हणजे ८६ बालवाड्या या 'एल' विभागात आहेत. तर नवीन प्रस्तावानुसार या विभागात आणखी २५ बालवाड्या सुरू करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. ज्यामुळे या विभागातील बालवाड्यांची संख्या आता १११ एवढी होणार आहे. यामध्ये १० इंग्रजी, १ गुजराती, हिंदी २६ (नवीन ३ सह), ३३ मराठी (नवीन १६ सह), सेमी इंग्रजी २, उर्दू ३९ (नवीन ३ सह); अशा सहा भाषिक बालवाड्यांचा समावेश आहे.

Post Top Ad

test