बेस्टच्या बोनसवर शिक्कामोर्तब - मात्र तारखेबाबत अनिश्चितता

Anonymous

मुंबई - बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्याबाबतचा प्रस्ताव आज बेस्ट समितीने मंजूर केल्यामुळे बोनस मिळण्याबाबत शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र प्रशासनाकडून तारखेबाबत ठाम निर्णय झाला नसल्याने प्रत्यक्षात बोनसची रक्कम बेस्ट कर्मचाऱ्यांच्या हातात कधी पडेल याबाबत अनिश्चितता आहे.
 
बेस्ट कर्मचाऱ्याना बोनस देण्याचा निर्णय दिवाळी दरम्यान घेण्यात आला. मात्र तसा प्रस्ताव बेस्ट समितीत मंजूर झालेला नव्हता त्यामुळे बोनसबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली होती. मात्र आज बेस्ट प्रशासनकाडून बोनसचा प्रस्ताव आणला गेल्याने आणि तो मंजूर झाल्यामुळेकर्मचाऱ्यांना बोनस मिळण्याबाबत शिक्कामोर्तब झाले. 

या प्रस्तावावर बोलताना सुहास सामंत यांनी सांगितले कि महाव्यवस्थापकांनी बोनस जाहीर केला असल्याने त्यांच्या पदाचे महत्व लक्षात घेता तो निर्णय तात्काळ अंमलात आणण्याची गरज आहे, शिवसेनेला याचे श्रेय मिळू नये यासाठी कोणी प्रयत्नशील आहे का अशी शंकाही त्यांनी उपस्तिथ केली तर सुनील गणाचार्य यांनी बोनसच्या घोषणेची कार्यवृत्तांतात [ मिनिट्स ] मध्ये नोंद आहे का असा सवाल करीत प्रशासनानाने तारीख घोषित करावी अशी मागणी केली, तर अनिल कोकीळ यांनी सांगितले कि बोनस जाहीर करून महिना होत आला मात्र महाव्यवस्थापक मात्र चालढकल करीत आहेत. 

यावर बेस्ट प्रशासनाकडून बेस्टच्या आर्थिक बाबींचा पाढा पुन्हा वाचला गेला. टाटाला पैसे देण्यासाठी बेस्टला कर्ज घ्यावे लागले. यातून त्यांचे २०० कोटींचे बाकी बिल दिले गेले. तसेच कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीही महिन्याला ५६ कोटींची तरतूद करावी लागते, बोनस कधी देणार याचा निर्णय महाव्यवस्थापकच घेतील असे यावेळी महाव्यवस्थापकांनी स्पष्ट करत आपली बाजू मांडली. दरम्यान बोनस देण्यासाठी पैसे कसे आणणार ते महाव्यवस्थापकांनी स्पष्ट करावे, आणि याबाबतीत त्वरित तारीख जाहीर करावी असे आदेश बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांनी यावेळी दिले.
Tags