दहा हजारपैकी तब्बल नऊ हजार वॉटर हायड्रंट बंद

JPN NEWS
मुंबई - मुंबईत सातत्याने लागणाऱ्या आगीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी मुंबईमधील दहा हजारपैकी तब्बल नऊ हजार वॉटर हायड्रंट बंद असल्याची कबुली पालिका प्रशासनानेच दिली. गेल्या वर्षअखेरच्या काळात झालेल्या आगीच्या घटनांमध्ये अनेकांना नाहक जीव गमवावा लागला आहे. यामधील अनेक ठिकाणी अग्निशमन यंत्रणा ठप्प असल्याचे दुर्घटनेनंतर समोर आले आहे.

त्यामुळे गेल्या काही दिवसांच्या घटनांचा अहवाल सादर करा, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली होती. मात्र प्रशासनाने दिलेल्या उत्तराने सदस्यांचे समाधान झाले नसल्याने स्थायी समितीत चांगलीच खडाजंगी झाली. अग्निशमन दलाकडे आवश्यक साधनसामग्री नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला. आगीच्या दुर्घटनेनंतर अनेक ठिकाणी बेकायदा बांधकामामुळे अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचणे शक्य होत नाही. अशा बेकायदा बांधकामांना जबाबदार असलेल्या अधिकार्‍यांवर कारवाई का करीत नाही, असा सवाल सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी केला.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलात फायरप्रूफ जॅकेटसारख्या अत्याधुनिक यंत्रणा आणण्यासाठी अहवाल सादर करा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. यावेळी राष्ट्रवादीच्या राखी जाधव, सपाचे रईस शेख, कॉंग्रेसचे आसिफ झकारिया, अभिजित सामंत यांनीदेखील प्रशासनाच्या अकार्यक्षमतेवर टीका केली.

आगीच्या अनेक घटनांमध्ये संबंधित विभागातील अधिकार्‍यांचा बेजबाबदारपणा असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा घटनांना जबाबदार असणार्‍या वरिष्ठ अधिकार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे. अग्निशमन दलाच्या अत्याधुनिकरणासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याची गरज आहे. वारंवार घडणार्‍या आगींवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने कोणती कार्यवाही केली, दुर्घटना टाळण्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना केल्या याचे स्पष्टीकरण करावे, असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले.
Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !