हिमालय पूल दुर्घटनेतील मृतांची संख्या सात

मुंबई - सीएसटीएम येथील हिमालय पुलाच्या दुर्घटनेतील आणखी एकाचा मृत्यू झाला. नंदा कदम (57) असे त्यांचे नाव आहे. या दुर्घटनेतील मृतांची संख्या सात झाली आहे.  

सीएसटीएम येथे गुरुवार 14 मार्च 2019 रोजी संध्याकाळी 7.30 च्या सुमारास दादाभाई नौरोजी रोडवरील हिमालय पादचारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जण मरण पावले होते, तर 33 जण जखमी झाले होते. जखमींपैकी अनेकजणांना जीटी रुग्णालय, सेंट जॉर्ज येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. एकाला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये, तर नंदा कदम या वाशी येथील एमजीएम रुग्णालयात उपचार घेत होत्या. मात्र उपचारादरम्यान बुधवारी (10 एप्रिल) त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दुर्घटनेनंतर काही दिवसांतच डी. डी. देसाईज कंपनीच्या नीरजकुमार याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आझाद मैदान पोलिसांनी पालिकेचा निलंबित सहाय्यक अभियंता एस. एफ. काकुळते आणि कार्यकारी अभियंता ए. आर. पाटील यांना अटक केली.

अद्याप मदत नाही -
या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये तसेच गंभीर जखमींना 50 हजार रुपये तातडीची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली होती. मात्र ही मदतही आचारसंहितेच्या कचाट्यात अडकली. त्यामुळे जाहीर केलेली मदत अद्यापही मृतांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचलेली नाही. उपचार घेत असलेले रुग्ण मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
Tags