राज्य कंगाल करणाऱ्यांना बाजुला केले तरच चांगले दिवस येतील - अजित पवार

Anonymous

जालना - भोकरदन दि. १९ ऑगस्ट - राज्य कंगाल करणाऱ्यांना बाजुला केले तरच चांगले दिवस राज्याला येतील त्यामुळे आघाडीचे सरकार सत्तेवर आणल्याशिवाय गप्प बसू नका असे आवाहन विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी भोकरदन येथील जाहीर सभेत केले. आमच्या विचाराचं सरकार दिलात तर स्थानिकांना ७५ टक्के रोजगार मिळवून देण्यासाठी कायदा करु असे आश्वासनही अजितदादा पवार यांनी दिले.

महाराष्ट्रातील सरकारमध्ये शेतकर्‍यांचे प्रतिनिधीत्व करणारं कोण दिसतं नाही. धनंजय मुंडे यांनी २२ मंत्र्यांचे भ्रष्टाचार पुराव्यानिशी उघड केले परंतु त्या सर्वांना क्लीनचीट देण्यात आली फक्त एकनाथ खडसे वगळता असा टोलाही अजितदादा पवार यांनी लगावला.  मनसेचे नेते राज ठाकरे यांना ईडीची नोटीस काढली आहे. हे कोणत्या प्रकारचे राजकारण सुरु आहे. जो विरोधात बोलतो त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हे सरकार करतंय असेही अजितदादा पवार म्हणाले.

२० ते ४० कोटी रुपये देवून आमदारांना फोडले जात आहेत. एवढा निधी आला कुठुन असा सवाल करतानाच कर्नाटक आमदारांकडे ११ कोटीची कार आली असल्याचा किस्सा अजितदादा पवार यांनी यावेळी सांगितला. उद्योगधंदे बंद झाले आहेत. कंपन्या बंद झाल्या आहेत. त्यामुळे आता लक्षपूर्वक काम करा आणि आघाडीचे राज्य आणल्याशिवाय पर्याय नाही असेही अजितदादा पवार म्हणाले. आपल्या भाषणात अजितदादा पवार यांनी सयाजी शिंदे यांनी सरकारवर वृक्ष लागवडीबाबत गंभीर आरोप केल्याचे सांगत हे सरकार कसे फसवणूक करत आहे हे यावरुन लक्षात घेऊन काम करा असेही अजितदादा पवार म्हणाले. एकदा फसलात आता पुन्हा फसू नका असे आवाहन अजितदादा पवार यांनी केले.