Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

कोल्हापूर, सांगली, कराडमधील पूरग्रस्तांना केंद्र व राज्य शासनाकडून मदत


मुंबई, दि. 8 : राज्यातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीवर नियंत्रण राखण्याबरोबरच पूरग्रस्त नागरिकांना राज्य सरकारकडून सर्व प्रकारची मदत दिली जात असून या प्रयत्नांना केंद्र सरकारकडून तत्परतने मदत केली जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दूरध्वनीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आश्वस्त केले आहे. केंद्र सरकार संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याची माहितीही गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली.

राज्यातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांनी यावेळी पूरस्थितीचे हवाई सर्वेक्षण आणि पूरग्रस्त भागाची पाहणी करून पूरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या मदतीच्या ठिकाणांना भेट दिली. तसेच पूरग्रस्तांच्या निवारा शिबिरामध्ये जाऊन त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे आदी उपस्थित होते. पूरस्थितीवर नियंत्रण राखण्याबरोबरच पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व उपाययोजनांना गती देण्यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी संबंधित स्थानिक यंत्रणांना निर्देश दिले.

कर्नाटकातील आलमट्टी धरणाच्या फुगवट्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये वाढलेली पुराच्या पाण्याची पातळी कमी करण्यासाठी या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याची विनंती फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांनी केली आहे. त्यानुसार आलमट्टी धरणातून पाच लाख क्युसेक्स पाणी सोडण्याचे येडीयुरप्पा यांनी मान्य केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ), राज्य आपत्ती निवारण दल (एसडीआरएफ), भारतीय हवाई दल, नौदल, कोस्टल गार्ड आदी संस्थांचे चमू कार्यरत आहेत. कोल्हापूर परिसरात एकूण 22 मदत पथके कार्यरत असून त्यामध्ये एनडीआरफ-5, नेव्ही-14, कोस्टगार्ड-1, आर्मी कॉलम -1, एसडीआरएफ-1 आदींचा समावेश आहे. तसेच सांगलीमध्ये एकूण 11 पथके कार्यरत असून त्यामध्ये एनडीआरएफ-8, कोस्टगार्ड-2 आणि आर्मी-1 आदींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे मदतकार्यासाठी आणखी पथके मागविण्यात आली असून पाच पथके पुण्यापर्यंत पोहोचली असून कोल्हापूर व सांगलीकडे येण्यास प्रत्येकी दोन पथके मार्गस्थ झाली आहेत. तसेच त्यातील एक पथक पुण्यात कार्यरत आहे. कोस्टगार्डची आणखी दोन पथके कोल्हापूरमध्ये आणि नौदलाची पाच व एसडीआरएफची दोन पथके सांगलीमध्ये पोहोचत आहेत. गतिमान बचाव कार्यासाठी आणखी पाच एनडीआरएफ टीम मागविण्यात आल्या असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी विशेष रेल्वे गाडी -
कोल्हापूर आणि सांगली परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्तेवाहतूक विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाकडून मिरज आणि कराड दरम्यान विशेष रेल्वे चालवण्यात येणार असल्याचे रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी मुख्यमंत्र्यांना कळविले आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom