आपत्कालीन परिस्थिती काय करावे, जे. जे. रुग्णालय पुस्तिका काढणार

Anonymous


मुंबई - पूर, इमारत कोसळणे, आग लागणे अशा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास काय करायला हवे, याबाबत जे. जे. रुग्णालय लवकरच माहिती पुस्तिका काढणार आहे. सद्याच्या परिस्थितीत ही माहिती पुस्तिका डॉक्टरांसह सर्वसामान्यांनाही फायदेशीर ठरणार आहे.

महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना तातडीने वैद्यकीय सेवा-सुविधा मिळाव्यात, यासाठी अनेक सरकारी आणि खासगी डॉक्टर याठिकाणी दाखल झाल आहेत. मुंबईतील डॉक्टरांची टीमही त्याठिकाणी पोहचली असून मदतकार्य सुरू आहे. मात्र पूर आणि त्यासारखी इतर आपात्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्यावेळी काय करता येईल याबाबत माहिती असणे आवश्यक आहे. जे. जे. रुग्णालय त्यासाठी लवकरच माहिती पुस्तिका काढणार आहे. 

जे. जे. रुग्णालयातील ८ विभागाच्या प्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत पूरग्रस्त भागातील आजार, तिथल्या लोकांसाठी वैद्यकीय सेवा, डॉक्टरांची उपलब्धता याचा आढावा घेण्यात आला.पूरग्रस्त भागात दूषित पाण्यामुळे अनेकांना जुलाब, अतिसार, कॉलरा होण्याची भीती आहे. याशिवाय सगळीकडे पसरलेला चिखल, मृत जनावरे, अस्वच्छता अशा अनेक गोष्टींमुळे संसर्गाचा धोका लक्षात घेऊन आवश्यक औषधे पाठवण्यात आली आहेत. पूरग्रस्त भागातील नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरवताना कुठल्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी सरकारच्या वतीने जे. जे. रुग्णालयामार्फत दोन ट्रक भरून औषधांचा साठा कोल्हापूर येथील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याशिवाय अशी आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास नेमके काय करावे याबाबत मार्गदर्शनपर एक माहिती पुस्तिका काढण्यात येणार आहे. यासाठी सर्व विभागातील प्रमुखांची मदत घेतली जाईल. असे जे. जे. रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी सांगितले. 
 
पुराच्या पाण्यामुळे अनेकांची कुटुंबं उद्धवस्त झाली आहेत. त्यांचे सरकारद्वारे पुनर्वसन करण्यात येईल. मात्र नागरिक मानसिकरित्याही खचून गेले आहेत, त्यांना मानसिक आधार देणे गरजेचे आहे. त्यामुळे गरज भासल्यास पूरग्रस्त भागात डॉक्टरांची टीम जाईल यात मनोविकार तज्ज्ञ देखील या पथकात असतील, असेही त्यांनी सांगितले.
Tags