पर्यावरण पूरक १०० 'मियावाकी' वने विकसित करण्याचे पालिकेचे लक्ष्य

मुंबई - मुंबई महापालिका क्षेत्रातील पर्यावरणाचे संवर्धन व्हावे व पर्यावरण सुसंगतता साधली जावी, यासाठी मुंबई महापालिका क्षेत्रात १०० ठिकाणी 'मियावाकी' पद्धतीची शहरी वने विकसित करण्याचे महापालिकेच्या उद्यान विभागाने निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर ६० ठिकाणे निर्धारित केली असून उर्वरित ४० ठिकाणांचे नियोजन लवकरच करण्यात येणार आहे. यानुसार ६० ठिकाणी मियावाकी पद्धतीची वने विकसित करण्यासाठी लवकरच निविदा मागविण्यात येणार आहे.

मियावाकी पद्धतीच्या शहरी वनांसाठी मियावाकी वनांच्या क्षेत्रातील तज्ज्ञ संस्थांची मदत घेतली जाणार आहे. तसेच उर्वरित ४० ठिकाणांबाबत 'सीएसआर' अंतर्गत मियावाकी पद्धतीने वने विकसित करण्याचे लक्ष्य आहे. ही सर्व वने नागरिकांसाठी मुक्तद्वार ठेवणे संबंधित कंपन्यांना बंधनकारक करण्यात येणार आहे. महापालिकेने उद्याने, मैदाने आदींबाबत प्रस्तावित केलेल्या धोरणाचा या 'मियावाकी' पद्धतीच्या वनांशी संबंध नसून दोन्ही वेगवेगळ्या बाबी आहेत, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली. 

महापालिका क्षेत्रातील पर्यावरणाच्यादृष्टीने सकारात्मक ठरतील अशी 'मियावाकी' पद्धतीची १०० वने उभारण्याचे लक्ष्य प्रशासनाचे आहे. सामान्य उद्यानांच्या किंवा वनांच्या तुलनेत मियावाकी पद्धतीने विकसित करण्यात येणा-या वनांमधील झाडे ही अधिक वेगाने वाढतात. एरवी सामान्य पद्धतीने लावलेले झाड वाढण्यास जेवढा कालावधी लागतो, त्यापेक्षा साधारणपणे निम्म्यापेक्षा कमी कालावधीत तेवढ्याच उंचीचे झाड वाढते. तसेच साधारणपणे २ वर्षात विकसित होणा-या मियावाकी पद्धतीच्या वनांमध्ये झाडांमधील अंतर हे कमी असल्याने ती घनदाट असतात. १०० ठिकाणी या पद्धतीची वने विकसित करण्याचे पालिका प्रशासनाने ठरविले आहे. यापैकी ६० ठिकाणी विकसित करण्यात येणा-या मियावाकी वनांसाठी लवकरच निविदा मागविण्यात येणार आहेत. तर उर्वरित ४० ठिकाणी 'सीएसआर' अंतर्गत मियावाकी वने विकसित केली जाणार असल्याचे परदेशी यांनी सांगितले.

'सीएसआर' अंतर्गत मियावाकी वने विकसित करणार --
सीएसआर अंतर्गत संबंधित कंपन्यांद्वारे मियावाकी पद्धतीच्या वनांची लागवड केली जाणार आहे. तर वनांची देखभाल व परिरक्षण हे महापालिकेद्वारेच करण्यात येईल. ही लागवड मियावाकी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच केले जाईल. तसेच सर्वसामान्य नागरिकांना मुक्त प्रवेश असेल. सीएसआर अंतर्गत मियावाकी वने विकसित करण्यासाठी प्रतिसाद न मिळाल्यास पालिका स्वतः त्या ठिकाणी मियावाकी वने विकसित करणार आहे.
Tags