पावसामुळे जनजीवन विस्कळीत

Anonymous
मुंबई - शनिवारी दिवसभर धो- धो पाऊस कोसळल्याने मुंबईसह, नवी मुंबई, ठाण्यातील जनजीवन विस्कळीत झाले. मुंबईची लाईफलाईन असलेली रेल्वे वाहतूक ठप्प झाली. लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द करण्यात आल्या. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली जाऊन तलावाचे स्वरुप आल्याने वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला होता. मिठी नदीने धोक्याची पातळी गाठल्याने तेथील रहिवाशांना स्थलांतरीत करण्यात आले. येत्या २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

मुंबई आणि उपनगरांत शुक्रवारी रात्रीपासून पावसाने संततधार कायम ठेवली आहे. शनिवारी पावसाने तुफान बॅटिंग करीत मुंबईसह, ठाणे, नवी मुंबईला झोडपून काढले. रेल्वे रुळावर पाणी आल्याने बंद पडलेली रेल्वे वाहतूक संध्याकाळी धिम्या गतीने सुरु झाली. मात्र पुन्हा मध्यरात्रीपासून पावसाने पुन्हा कोसळधार सुरु ठेवून रविवारीही दिवसभर बरसला. रौैद्ररुप धारण केलेल्या पावसाने मुंबईची लाईफलाईन बंद पाडली. सायन, किंग्जसर्क ल, चुनाभट्टी, कु र्ला, भांडुप येथील रेल्वे रुळावर पाणी आल्याने सकाळपासून वाहतूक कोलमडली. मुसळधार पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाबरोबरच मुंबईतील रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मुसळधार पावसामुळे मुंबई, उपनगरे, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्याने लांब पल्ल्याच्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. मुंबईतील उपनगरीय वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेतानाच रेल्वे प्रशासनाने लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्याही रद्द करण्याचा निर्णय घेतला.

पूर्व द्रुतगती महामार्गावर मुलुंड, विक्रोळी, घाटकोपर, विद्याविहार, सायन, माटुंगा, परळ या ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला. महामार्गावर घाटकोपर येथे मेट्रो मार्ग उभारण्याचे काम सुरू असल्याने तसेच अनेक ठिकाणी पडलेले खड्डे आणि पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा वेग अधिकच मंदावला. घाटकोपर-मानखुर्द, चेंबूर सांताक्रुज लिंक रोड, विक्रोळी -पवई मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पश्चिम द्रुतगती महामार्गावर दहिसरपासून वांद्रेपर्यंत वाहतूक संथगतीने सुरू होती. बोरीवली, कांदिवली, मालाड, अंधेरी सबवेत पाणी तुंबल्याने वाहतूक अन्य मार्गावर वळविण्यात आली होती. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड तसेच या मार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होती. मिठी नदीने धोक्याची पातळी गाठल्याने क्रांतीनगर परिसरातील सुमारे ४०० नागरिकांना जवळच असलेल्या बजारवाड महापालिका शाळेत स्थलांतरीत करण्यात आले आहे. मुंबईत चेंबूरच्या शेल कॉलनीत, पीएल लोखंडे मार्ग, किंग्ज सर्क ल येथे पाणी भरल्याने तलावाचे स्वरुप आले होते. पाणी साचल्याने काही ठिकाणी वाहने बंद पडली होती. मुसळधार पावसामुळे दिंडोशीमधील राजीव गांधी नगरच्या टेकडीचा भाग कोसळून ४ जण जखमी झाले. दुपारी असलेली समुद्राला भरती व याचवेळी जोरदार पाऊस पडल्याने सखल भागात पाणी साचले. काही ठिकाणी वाहतुक दुसºया मार्गाने वळवण्यात आली. घरांत, दुकानात पाणी शिरल्याने नागरिकांची धावपळ उडाली. मध्य व हार्बर मार्गावरील वाहतूक दिवसभर कोलमडल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले.
Tags