Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

यांना पाच वर्षांत काहीही करता आलं नाही - अजित पवार

जालना बदनापुर दि. १९ ऑगस्ट - आमच्या सत्तेच्या कालावधीतच विकासकामे झाली...आम्ही करुन दाखवलं आहे परंतु यांना पाच वर्षांत काहीही करता आलेले नाही असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी केला. जालना जिल्ह्यातील बदनापुर येथे शिवस्वराज्य यात्रेची दुसरी सभा पार पडली.

५४ वर्षात अडीच लाख कोटी रुपये कर्ज झाले होते परंतु तेच या सरकारने पाच वर्षांत पाच लाख कोटीवर कर्ज नेवून ठेवलं आहे याचा जाब विचारायचा नाही का? असा संतप्त सवाल अजितदादा पवार यांनी केला. माझ्या शेतकऱ्यांना पीकविमाचे पैसे सरकार देत नाही. सरकार तुमचं... मग कसलं आंदोलन करता, कशाला लोकांची फसवणूक करता असा सवालही अजितदादा पवार यांनी शिवसेनेला केला. गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमचं सरकार... बदनापुर नगरपंचायतीमध्ये सत्ता भाजपाची मग एक - एक महिना लोकांना का पाणी देत नाही असा सवालही अजितदादा पवार यांनी केला. या नाकर्ते सरकारच्या काळात १५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यातील जनता वार्‍यावर पडली आहे का? असा संतप्त सवाल करतानाच अजितदादा पवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

तर भाजप- सेनेचं 'बी' सुद्धा दिसले नसते - धनंजय मुंडे
सेना - भाजप जे राजकारण करतेय तशापध्दतीचे अजितदादा पवार यांनी राजकारण केलं असतं तर भाजप - सेनेचे बी सुद्धा दिसले नसते असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बदनापुरच्या जाहीर सभेत दिला. या सरकारने मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचे जाहीर केले खरे परंतु होते नव्हते ते ढगच सध्या गायब झाले आहेत आणि आज उन्हाच्या झळा मराठवाडा सोसत आहे असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला. 

पाच वर्षांत छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची स्मारकं पुर्ण करता आलेली नाहीत. महापुरुषांचा अपमान करणार्‍या सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीने शिवस्वराज्य यात्रा काढली आहे असेही धनंजय मुंडे म्हणाले.  पिस्तुल्या महाजन पुरग्रस्त भागात सेल्फी काढण्यासाठी गेले होते तर दुसरीकडे सदा खोत भाजपच्या नादाला लागून न्युज चॅनेलचा प्रतिनिधी घेवून पुरग्रस्त भागात गेले आणि एकाच व्यक्तीला पुन्हा पुन्हा बोटीत घेतले. अहो हे सगळे मडयावरचं लोणी खाणारी ही औलाद आहे अशी घणाघाती टीका करतानाच सावध व्हा आणि शिवस्वराज्य यात्रेला आशिर्वाद द्या असे आवाहन धनंजय मुंडे यांनी जनतेला केले.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. माजी मंत्री राजेश टोपे यांनीही आपले विचार मांडले. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री राजेश टोपे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिक्षक आमदार विक्रम काळे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सुरज चव्हाण, जिल्हाध्यक्ष निसार देशमुख, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष कैलास पाटील,माजी आमदार अरविंद चव्हाण, वक्ता सेलचे अध्यक्ष प्रदीप सोळंके आदींसह पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom