एनडीए-२ सरकारपुढे विकास व विश्वास मोठे आव्हान होते - मोदी

Anonymousरोहतक : विक्रमी मताधिक्याच्या जोरावर दुसऱ्यांदा देशाची सत्ता पादाक्रांत केल्यानंतर एनडीए-२ सरकारमधील पहिल्या शंभर दिवसांत विकास, विश्वास आणि इतर महत्त्वाच्या आव्हानांचा सामना केला, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. कृषिक्षेत्र आणि राष्ट्रीय सुरक्षेसह अनेक मुद्द्यांवर कठोर निर्णय घेतल्याचे मोदींनी सांगितले. हरयाणात मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाची गरज आहे, अशी कौतुकाची थाप मारत पंतप्रधानांनी आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

हरयाणाच्या रोहतक जिल्ह्यात एका राजकीय सभेला संबोधित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशहितासाठी निर्णय घेताना केंद्र सरकार कधीही डगमगले नाही. सव्वाशे कोटी जनतेची प्रेरणा असल्यामुळेच आम्हाला कठोर निर्णय घेता आले. एनडीए-२ सरकारच्या पहिल्या संसदीय अधिवेशनात अनेक महत्त्वाची विधेयके पारित झाली आहेत. संसदेत एवढे कामकाज देशाच्या इतिहासात कधीच झाले नाही, असे सांगत मोदींनी सर्वच पक्षांच्या नेत्यांचे आभार मानले आहेत. आपल्या भाषणातून नरेंद्र मोदी यांनी आगामी हरयाणा विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. हरयाणात मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी अभूतपूर्व कामे केली. घराणेशाही, भ्रष्टाचारावर त्यांनी प्रहार केला. बेरोजगारी मिटवत गुन्हेगारीला चाप लावण्यात त्यांना मोठे यश आले. त्यामुळे आगामी काळातही राज्याला त्यांच्या सक्षम नेतृत्वाची गरज आहे, असे सांगत त्यांनी निवडणूक प्रचारास सुरुवात केली. लोकसभा निवडणुकीत हरयाणातील जनतेने प्रचंड मताधिक्याने भाजपाला विजयी केले. राज्यात ५५ टक्के मते भाजपाच्या झोळीत जमा झाली. आता याच धर्तीवर विधानसभा निवडणुकीतही भाजपाला कौल देण्याचे आवाहन मोदींनी केले. दुसरीकडे, लोकसभेतील पराभवामुळे विरोधकांची मनं सुन्न झाल्याची टीका त्यांनी केली आहे.