अंधेरी, बोरिवली, दहिसरला अडीच वर्षांत मुबलक पाणी


मुंबई - बोरिवली, दहिसर, कांदिवली, अंधेरी, गोरेगाव आणि मालाड या उपनगरांच्या पश्‍चिम भागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी जलवाहिन्या बदलण्याची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात येणार आहेत. ही कामे सुमारे अडीच वर्षांत पूर्ण झाल्यावर या भागात मुबलक पाणीपुरवठा होईल, असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले.

या उपनगरांतील पश्‍चिम भागात काही वर्षांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले होते. त्याचे पडसाद महापालिकेच्या स्थायी समितीत व महासभेतही उमटले. जलअभियंता खात्याच्या कारभारावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी जोरदार ताशेरे ओढले. महापालिकेचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी पश्‍चिम उपनगरातील अंधेरी ते दहिसर या भागात जलवाहिन्या बदलण्याची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात येणार आहेत.
100 मिलिमीटर ते 750 मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिन्या नव्याने टाकणे, छेदजोडण्या करणे आदी कामे करण्यात येतील. ही कामे 31 महिन्यांच्या कालावधीत करण्यात येणार आहेत. त्यांचे प्रस्ताव स्थायी समितीकडे आले आहेत. जलवाहिन्या बदलण्याची कामे मे. आर. के घुले आणि मे. परफेक्‍ट इंजिनिअरिंग असोसिएट्‌स प्रा. लि. यांना दिली जाणार असून, त्यासाठी महापालिका 68 कोटी 20 लाख रुपये मोजणार आहे.

एमएमआरडीएकडून घेणार खर्च -
एमएमआरडीएच्या कामांमुळे काही ठिकाणी जलवाहिन्या फुटल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळेच या जलवाहिन्या बदलाव्या किंवा अन्यत्र वळवाव्या लागत असल्याचा दावा महापालिकेच्या जलअभियंता विभागाने केला आहे. त्यामुळे या कामाचा खर्च एमएमआरडीएकडून वसूल केला जाणार असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले. सध्या या कामांचा खर्च महापालिकेच्या अर्थसंकल्पी निधीतून केला जाणार आहे.
Previous Post Next Post