मुंबईत कोरोना रुग्णांचा डबलिंग रेट २७ दिवसांवर


मुंबई - मुंबई महानगरपालिकेकडून कोरोना रोखण्यासाठी केल्या जाणार्‍या प्रभावी उपाययोजनांमुळे कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी पालिकेला यश येत आहे. मुंबईत कोरोना रुग्णांचा डबलिंग रेट आता २७ दिवसांवर पोहचला आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढत असल्याने पालिकेला कोरोनाचा प्रसार रोखण्यात काही प्रमाणात यश मिळताना दिसत आहे. 

काही दिवसांपूर्वी मुंबईचा रुग्णांचा डबलिंग रेटचा कालावधी २५ दिवसांवर होता. हा कालावधी आता वाढून २७ झाला आहे. यात एम - पूर्व आणि एफ उत्तर या विभागातील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५५ च्या वर पोहचला आहे. तर एम -पूर्वेचा ५३ वर पोहोचला आहे. तर जी -उत्तर आणि एच - पूर्वमध्ये हा कालावधी ४८ आहे. ई -विभागात ४६ वर असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. दाटीवाटीच्या आणि झोपडपट्ट्यांच्या या भागात रुग्ण घटत असल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा आहे.

‘चेसिंग द व्हायरस’ या पालिकेच्या मोहिमेला आता ब-यापैकी यश येत आहे. एका पॉझिटिव्ह रुग्णामागे १५ जणांना क्वारंटाइन करण्यात येत आहे. रुग्णांवर दर्जेदार उपचार केले जात आहेत. तसेच क्वारंटाइन सेंटरमध्ये लाफिंग थेरपी, योगा थेरपी, सकस आहार आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी केल्या जाणार्‍या सहायक उपचारांमुळे कोरोना नियंत्रणात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पालिकेकडे सध्या ५० हजारांहून जास्त बेड उपलब्ध आहेत. १० हजार ४०० बेड पालिकेच्या पोर्टलवर उपलब्ध आहेत. यामध्ये पुढील दहा दिवस प्रतिदिन ३०० आयसीयू बेड वाढवण्यात येणार आहेत. पालिकेच्या माध्यमातून मुंबईत १६८ ठिकाणी डायलिसिची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोरोना लढयात लवकरच यशस्वी होऊ असा विश्वास पालिका आयुक्तांनी व्यक्त केला.