मोदींच्या बायोपीक निर्मात्याची ड्रग-डीलिंग प्रकरणी चौकशी, कोणाला वाचवण्यासाठी सीबीआय - सचिन सावंत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 August 2020

मोदींच्या बायोपीक निर्मात्याची ड्रग-डीलिंग प्रकरणी चौकशी, कोणाला वाचवण्यासाठी सीबीआय - सचिन सावंत
मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील ड्रग कनेक्शन संदर्भात मोदींच्या बायोपीकचा निर्माता संदिपसिंहची चौकशी धक्कादायक असून सुशांतसिंग मृत्यू प्रकरणाशी भारतीय जनता पक्षाचे कनेक्शन काय, असा सवाल उपस्थित करुन मुंबई पोलीसांच्या तपासावर अविश्वास दाखवत भाजपाने सीबीआय तपासासाठी एवढी तत्परता कोणाला वाचवण्यासाठी केली, असे गंभीर प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केले आहेत.

सावंत पुढे म्हणाले की, संदीपसिंह हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकचा निर्माता आहे. हा चित्रपट २७ भाषेत बनवण्यात आला आहे आणि या चित्रपटाच्या पोस्टर लाँचिंगसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व कामे बाजूला ठेवून हजेरी लावली होती. बॉलिवूडमध्ये एवढे नामांकित निर्माते असताना संदीपसिंहच मोदींच्या बायोपीकसाठी कसा काय निवडला गेला. भारतीय जनता पक्ष, बॉलिवूड, संदीपसिंह व ड्रग्ज नेक्सस यांचा काय संबंध आहे याची चौकशी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी केली पाहिजे, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.

भाजपाच्या प्रवक्त्यांनी सुशांतसिंग प्रकरणातील ड्रग कनेक्शनची चौकशी करण्याची मागणी काल केली आहे. पण वस्तुस्थिती पाहता या प्रकरणी भाजपची तत्परता संशय घेण्यासारखी आहे असे म्हणत सावंत यांनी काही उपस्थित केले आहेत…फडणवीस सरकार असताना चौकशीचा आदेश का नाही? सीबीआय आणि ईडीला घाईघाईने आणण्याचे कारण संदीपसिंह होते का? आणि भाजपचे सर्वोच्च नेते बॉलिवूडच्या अगदी जवळून संपर्कात असल्याने त्यांची ड्रग्जच्या व्यवहाराला फूस होती का?

नरेंद्र मोदी यांच्याशी संबंधित व्यक्ती वादग्रस्तच कशा काय निघतात. मोदींचा सूट १० लाखांना खरेदी करणारा व्यक्ती गुजरातमधील व्हेंटीलेटर घोटाळ्यात सापडला. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांना बदनाम करण्यासाठी बनवण्यात आलेला, ऍक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर या चित्रपटाचा निर्माता विजय रत्नाकर गुट्टे हाही एका प्रकरणात गुंतला होता. तर मोदींनी, हमारे मेहुलभाई असा आदरपूर्वक उल्लेख केलेला मेहल चौक्शी बँकांना हजारो कोटींचा चुना लावून देश सोडून पळून गेला आणि आता संदीप सिंहची ड्रग कनेक्शनबदद्ल चौकशी.

भाजपाचे अत्यंत वरिष्ठ नेते आणि बॉलिवूडचे घनिष्ठ संबंध लपून राहिलेले नाहीत. या सर्व पैलूंचा विचार करता कोणाला तरी वाचवण्यासाठीच भाजपाकडून पद्धतशीरपणे सुशांतसिंग प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी लावून धरण्यात आली होती असा संशय बळावतो. महाराष्ट्र सरकारने याची गंभीर दखल घेऊन चौकशी करावी, असे सावंत म्हणाले.

Post Bottom Ad