मुंबई महापालिकेत काँग्रेसचा महापौर बसवण्याचा संकल्प

Anonymous
0


मुंबई - येत्या निवडणुकीत मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा तिरंगा फडकवण्याचा आणि मुंबई महापालिकेत काँग्रेसचा महापौर बसवण्याचा संकल्प काँग्रेसच्या १३६ व्या स्थापना दिवस कार्यक्रमात करण्यात आला. मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश यावेळी काँग्रेस नेत्यांकडून कार्यकर्त्यांना देण्यात आले. यावेळी भाजपने महापालिकेतील आपल्या ८२ जागा वाचवून दाखवाव्यात, असे खुले आवाहन नवनिर्वाचित अध्यक्ष भाई जगताप यांनी दिले.

काँग्रेसचा १३६ वा स्थापना दिवस आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, माणिकराव ठाकरे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, अस्लम शेख, एकनाथ गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्र भाई जगताप यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

यावेळी बोलताना माजी मंत्री नसीम खान यांनी काँग्रेसने त्यावेळी गोऱ्या लोकांबरोबर लढाई केली होती. आता चोरांशी लढाई करण्याची वेळ आली आहे. भाजपने देशाला रसातळाला नेले आहे. त्यामधून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशाला बाहेर काढण्याची गरज आहे. त्यासाठी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा तिरंगा फडकवूया. महापालिकेच्या सर्व २२७ जागा लढवूया आणि महापौर काँग्रेसचा बनवूया असे संकल्प करू या असे नसीम खान म्हणाले.

महापालिकेवर काँग्रेसचा तिरंगा फडकवूया. महापालिकेत काँग्रेसचा महापौर बसवूया त्यासाठी काम करूया. महापौर आमचा झाला नाही तरी ७५ जागा निवडून आणू शकतो अशी ताकद निर्माण करा. आमच्या शिवाय कोणीही महापौर बनवू शकणार नाही, इतक्या जागा निवडून आणा असे मंत्री अस्लम शेख म्हणाले.

यंदाची महापालिका निवडणूक काँग्रेसच्या आवाजाने गाजणार हे नक्की आहे. चंद्राकांत हंडोरे यांच्यानंतर पुन्हा एकदा काँग्रेसचा महापौर मुंबई महापालिकेत निवडून आणायची ताकद आपल्यात आहे. एकदा मुंबईचा महापौर काँग्रेसचा बनवा, राज्यात मुख्यमंत्रीही महाराष्ट्राचा बनवू, असे मंत्री व महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.

मुंबईची आगळी वेगळी ओळख आहे. मुंबईत काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. याच मुंबईमधून सर्व खासदार काँग्रेसचे निवडून आले होते. आमदारही मोठ्या प्रमाणात निवडून आले होते. याची आठवण करून देत काँग्रेसपासून दूर गेलेल्या लोकांना पुन्हा काँग्रेसजवळ आणण्याचे काम करा. महापालिका ही पहिली परीक्षा आहे. यापुढे विधानसभा, लोकसभा निवडणुका आहेत. खांद्याला खांदा लावून काम करूया, असे मंत्री अशोक चव्हाण म्हणाले.

यावेळी बोलताना, नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी काँग्रेसचा कार्यकर्ता खांद्यावर झेंडे घेऊन प्रचार करून नगरसेवक, आमदार, खासदार निवडून आणतात. त्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची एकमेव जागा मुंबई महापालिका असल्याने २२७ जागा लढवण्याची परवानगी द्या, अशी मागणी राज्य आणि केंद्रीय काँग्रेसकडे केली. गुरुदास कामत, मुरली देवरा यांनी ज्या उंचीवर मुंबईत काँग्रेसला पोहचवले आहे. त्याच उंचीवर आम्ही काँग्रेसला नेऊ, असा विश्वास जगताप यांनी यावेळी व्यक्त केला. भारत जलाओ पार्टी (बीजेपी)ने येत्या निवडणुकीत आपल्या ८२ जागा वाचवून दाखवाव्यात असे खुले आवाहनही जगताप यांनी यावेळी दिले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)