Type Here to Get Search Results !

महावीर नगर येथील संक्रमण गाळ्यांची विक्री बेकायदेशीर - विनोद घोसाळकर


मुंबई, दि.२८ डिसेंबर २०२० - म्हाडाच्या इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील महावीर नगर कांदिवली येथे बांधकाम सुरु असलेल्या संक्रमण शिबिरातील गाळे स्वस्त दरात सोडत प्रक्रिया वगळता उपलब्ध करवून देतो असे सांगून म्हाडाचे खोटे दस्तावेज तयार करून सर्वसामान्य नागरिकांकडून पैसे उकळले जात असल्याची बाब निदर्शनास आली आहे. लवकरच या प्रकरणाची चौकशी करून म्हाडातर्फे एफ आय आर दाखल केला जाणार आहे, अशी माहिती मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी आज दिली.  

वांद्रे येथील म्हाडाच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना घोसाळकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे कि म्हाडाच्या सदनिका पारदर्शक संगणकीय सोडत प्रक्रियेद्वारे च वितरित केल्या जातात आणि म्हाडाने या कामाकरीता कोणत्याही प्रतिनिधीची, मध्यस्थांची, दलालांची नेमणूक केली नाही. या मध्यस्थांमार्फत नागरिकांना दाखविण्यात येणारे दस्तावेज खोटे असून सर्व प्रकारामध्ये म्हाडातील कोणत्याही अधिकाऱ्याचा संबंध नाही . तसेच म्हाडातील संक्रमण शिबिरातील गाळे हे तात्पुरत्या स्वरूपातील निवारा म्हणून प्रकल्प बाधितांना दिली जातात आणि म्हाड कायद्यातील तरतुदींनुसार संक्रमण शिबिरातील गाळे विकता येऊ शकत नाहीत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही प्रकारे पैशांचे व्यवहार करू नयेत , असेही घोसाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

म्हाडा ही संस्था सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची संस्था असून गेल्या ७० वर्षांपासून नागरिकांचे गृहस्वप्न साकारण्याचे काम म्हाड कायदा -१९७६ नुसार काम करीत आहे. म्हाडातर्फे बांधण्यात आलेल्या सदनिका या जाहीर संगणकीय सोडत प्रक्रियेद्वारे वितरित केल्या जातात. त्याकरीता विक्रीस उपलब्ध असलेल्या सदनिकांची जाहिरात नागरिकांच्या माहितीसाठी वर्तमान पत्रांतून प्रसिद्ध करण्यात येते. म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर सदनिका विक्रीचे अर्ज नागरिकांकडून मागविले जातात आणि अर्जाची रक्कम व अनामत रक्कम म्हाडाने जाहिरातीत नमूद बँकेतच जमा केली जाते. या सर्व प्रक्रियेनंतर सदनिकांची जाहीर संगणकीय सोडत काढण्यात येते. ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पध्दतीने राबविण्यात येते.

करिता सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, अशा प्रकारे नागरिकांनी कोणत्याही मध्यस्थांच्या/दलालांच्या/व्यक्तींच्या आश्वासनांना, भूल थापांवर विश्वास ठेवू नये. अशा प्रकारच्या कुठल्याही प्रलोभनांना बळी न जाता म्हाडाच्या पारदर्शक संगणकीय सोडत प्रणालीवर आधारित प्रक्रियेतच सहभाग घ्यावा. म्हाडाच्या सदनिकांचे वितरण हे केवळ संगणकीय सोडत प्रणालीच्याच माध्यमातून करण्यात येत असते. भविष्यातही हीच कार्यप्रणाली कार्यरत राहणार असून याकरिता कोणत्याही मध्यस्थांची, दलालांची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

अशा प्रकारच्या व्यवहारांमध्ये सहभागी झाल्यामुळे फसगत झाल्यास म्हाडा प्रशासन जबाबदार राहणार नाही, असे म्हाडाच्या वतीने कळविण्यात येत आहे. तुमची अशाप्रकारे फसवणूक होत असल्याची माहिती म्हाडाच्या मुख्य दक्षता व सुरक्षा विभागास पुढील पत्त्यावर कळवावी. मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी, गृहनिर्माण भवन, चौथा मजला, कला नगर, वांद्रे पूर्व, मुंबई -५१. दूरध्वनी क्रमांक - ०२२-६६४०५४४५, ०२२-६६४०५४४६
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad