विमान प्रवाशांना १४ दिवसांचे क्वारंटाईन सक्तीचे

Anonymous
0


मुंबई - ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूमधील नवीन प्रकार समोर आला आहे. याचा प्रसार होऊ नये म्हणून युके, ब्रिटन, साऊथ आफ्रिका, मिडल इस्ट आणि युरोप येथून आलेल्या प्रवाशांना १४ दिवस क्वारंटाईन करावे, असे आदेश केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या गाईडलाईन नुसार राज्य सरकारने दिले आहेत. त्याची अंमलबजावणी मुंबईत करावी, असे परिपत्रक पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी काढले आहे. यामुळे ७ दिवसात निगेटिव्ह आलेल्या प्रवाशांना आणखी ७ दिवस क्वारंटाईन राहावे लागणार आहे.

मुंबईत मार्च पासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. कोरोना विषाणूचा प्रसार आटोक्यात येत असतानाच ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सावध भूमिका घेत इंग्लड मधून येणारी विमान सेवा २३ डिसेंबर ते ५ जानेवारी २०२१ पर्यत बंद केली आहे. तसेच युके, साऊथ अफ्रिका, आखाती देश (मिडील इस्ट) व युरोपियन देशातून येणाऱ्या प्रवाशांना विमानतळावर दाखल होताच मुंबईतील विविध हाॅटेल मध्ये क्वारंटाईन केले जात आहे.

क्वारंटाईनच्या नियमात बदल -
ब्रिटन आणि युके येथून येणाऱ्या प्रवाशांना ७ दिवस हॉटेलमध्ये क्वारंटाईन केले जाणार होते. या प्रवाशांची ५ व्या दिवसांपासून ७ व्या दिवसापर्यंत कोरोना चाचणी करावी. त्या चाचणीत ते निगेटिव्ह आल्यास त्यांना घरी सोडून त्यांना पुढील ७ दिवस घरी होम क्वारंटाईन करावे, असे नियम आखून देण्यात आले होते. मात्र आता या नियमात बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांची ७ व्या दिवशी कोरोना चाचणी करावी. त्यात ते निगेटिव्ह आल्यास त्यांना घरी होम क्वारंटाईन करावे. तसेच पॉझिटिव्ह आल्यास तो प्रवासी युके, ब्रिटन येथील असल्यास त्याला सेव्हन हिल रुग्णालयात तसेच इतर देशातील प्रवासी असल्यास त्याला जीटी रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करावे, असे पालिका आयुक्तांनी परिपत्रकात म्हटले आहे.

दूतावासातील अधिकाऱ्यांना सूट -
ब्रिटनमध्ये समोर आलेला नवा कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर भारतात येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन केले जात आहे. मात्र यामधून दूतावसातील कर्मचाऱ्यांना सूट देण्यात आली आहे. तसेच जे अधिकारी मुंबईत कामानिमित्त येणार आहेत. त्यांनी आधी लेखी कळवून क्वारंटाईनमधून सूट मागितली तर त्यांना सूट दिली जाणार, असल्याचे आयुक्तांनी परिपत्रकात म्हटले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)