मुंबईत एकाच दिवसात ७० कावळे, कबुतर मेल्याच्या तक्रारी

Anonymous
0


मुंबई - मुंबईत बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याच्या सूचना महापालिकेच्या आरोग्य विभागाने केल्यानंतर पालिका आपत्कालीन विभागाकडे तक्रारींचा ओघ वाढू लागला आहे. आज एकाच दिवशी सुमारे ७० कावळे आणि कबुतर मृत झाल्याच्या तक्रारी नोंद झाल्याची माहिती पालिका आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.

रस्त्यावर कोणताही पक्षी मरून पडला असेल तर त्याला हात लावू नये. असा पक्षी आढळल्यास पालिकेच्या आपत्कालीन १९१६ या हेल्पलाईनवर संपर्क करण्याचे आवाहन पालिकेने केले होते. मुंबईकरांकडून यानंतर आता तक्रारींचा ओघ सुरू झाला आहे. आज दिवसभरात कुलाबा, बोरिवली, कांदिवली, मालाड, अंधेरी, दादर, प्रभादेवी, वडाळा, माटुंगा, सायन, मानखुर्द, चेंबूर, गोवंडी, चंदनवाडी आदी परिसरात कावळे आणि कबुतर असे एकूण ७० पक्षी मृत आढळून आल्याच्या तक्रारी हेल्पलाईनवर आल्या आहेत. सर्वाधिक ६५ कावळ्यांचा, तर ५ कबुतरांबाबत तक्रारी होत्या. मनपा घनकचरा विभाग आणि राज्य पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून मृत पक्षांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

हेल्पलाईन क्रमांक -
राज्यात बर्डफ्ल्यूचा प्रसार होत असताना मुंबईतही 12 कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकार आणि पालिकेने कंबर कसली आहे. त्यानुसार राज्य पशुसंवर्धन विभाग आणि महानगर पालिका यांच्या समन्वयाने बर्ड फ्ल्यू रोगासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मनपा हद्दीत पक्षांचा मृत्यू झाल्याचे आढळल्यास आपत्कालीन विभागातील हेल्पलाईन क्रमांक 1916 या नंबरवर तात्काळ संपर्क साधावा. हेल्पलाईनवर आलेल्या तक्रारींचे निवारणासाठी आप्तकालीन विभाग, संबंधित सहायक आयुक्त कार्यालयात अथवा वॉर रुममार्फत कार्यवाही केली जाणार आहे.

रॅपिड रिस्पॉन्स टीम -
मुंबईत मृत पक्षी आढळून येत आहेत. मात्र असे घटना दिसून आल्यास सरकारने नियुक्त केलेल्या त्वरित प्रतिसाद पथकातील (रॅपिड रिस्पॉन्स टीम) डॉ. हर्षल भोईर : 9987280921 आणि डॉ. अजय कांबळे : 9987404343 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

धोका नाही, पण काळजी घ्या -
बर्डफ्लूमुळे माणसांना काहीही धोका नाही, तरीही काळजी घेणे आवश्यक आहे. एखादा पक्षी किंवा प्राणी मारून पडला असल्यास त्याला हात लावू नये. त्याची माहिती पालिकेच्या विभाग कार्यालय किंवा आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला द्यावी. कच्चा मांसाहार करू नये. मटण, चिकन, अंडी चांगले शिजवून खाणे आवश्यक आहे, असे आवाहन मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)