आजपासून सर्वांसाठी लोकल प्रवास - नियमानुसार प्रवास न केल्यास दंडात्मक कारवाई - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

01 February 2021

आजपासून सर्वांसाठी लोकल प्रवास - नियमानुसार प्रवास न केल्यास दंडात्मक कारवाईमुंबई - राज्य सरकारच्या सूचनेनुसार १ फेब्रुवारी पासून सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकलचे दरवाजे खुले झाले आहेत. त्यामुळे मागील ११ महिने लोकलच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र कोरोनाचा धोका कायम असल्याने आखून दिलेल्या निर्धारीत वेळेतच प्रवास करावा लागणार आहे. नियमाचे उल्लंघन करून प्रवास करताना आढळल्यास २०० रुपये दंड आणि १ महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, अशी माहिती रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

कोरोनाच्या संकटामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकड़ाऊनमुळे मुंबई लोकलचे दरवाजे मागील ११ महिने बंदच होते. त्यामुळे अनेकांना गैरसोईला सामोरे जावे लागले. हातावर पोट असणा-यांचा रोजगार बुडाला. अत्य़ावश्यक सेवेसाठी व त्यानंतर महिलांना निर्धारित वेळेत लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली. मात्र सर्वसामान्यांना लोकल सेवेसाठी तब्बल ११ महिने प्रतीक्षा करावी लागली. कोरोना आटोक्यात आला असल्याने लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरु करण्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे सर्वसामान्यांची लोकल प्रतीक्षा संपली असून सोमवारपासून त्यांनाही या सेवेचा लाभ मिळणार आहे. मात्र कोरोना नियंत्रणात आला असला तरी धोका टळलेला नाही. त्यामुळे निर्धारित वेळेतच प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी एसओपी तयार केली आहे. याचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे.
 
पहाटे पहिल्या लोकलपासून सकाळी ७ पर्यंत, दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत व रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करण्याची मुभा सर्वसामान्य नागरिकांना देण्यात आली आहे. त्यामुळे आता वेळेचे भान ठेऊनच नागरिकांना प्रवास करावा लागणार आहे. रेल्वे स्थानकांमधील तिकीट खिडक्यांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी वेळेच्या अगोदर तिकीट खिडक्यांवर तिकीट देण्यात येईल, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

सोमवारपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सुरु झाली आहे. पहिला दिवस असल्याने प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकातील ३५० तिकिट खिडक्या ७३१ वेगवेगळ्या शिफ्टमध्ये सुरु करण्यात येणार आहे. तसेच ८० एक्सीलेटर व ४० लिफ्ट सुरु करण्यात येणार आहेत. कल्याण, ठाणे, घाटकोपर, दादर, भायखळा सीएसएमटी या मुख्य स्थानकांवर रेल्वेचे प्रमुख अधिकारी उपलब्ध असणार आहेत. तर पश्चिम रेल्वे मार्गावर असलेल्या ३०१ तिकिट खिडक्या ६४२ शिफ्टमध्ये सुरु करण्यात येणार आहेत. एटीवीएम मशीनही वाढवण्यात येणार आहे.

दरम्यान, पश्चिम रेल्वे मार्गावरील २०० प्रवेशद्वारापैकी ८६ सुरु होते. परंतु सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सुरु होत असल्याने २०० प्रवेशद्वार उघडण्यात येणार आहेत. प्रत्येक स्थानकात तपासणी करण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे मुंबई उपनगरीय रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्याने सांगितले.

Post Top Ad

test