Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

सहकार्य करा, लॉकडाऊन करण्यास भाग पाडू नका; शेवटचा इशारा



मुंबई दि १३ : गेल्यावर्षी ऑक्टोबरपासून आपण सर्व व्यवहार सुरु केले आणि त्यानंतर सुमारे ४ महिने आपण सर्वांनी एकजुटीने संसर्ग रोखला, पण आता मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी आणि नियम न पाळल्याने संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अजूनही परिस्थिती नियंत्रणात असून हॉटेल व उपाहारगृहांनी नियमांचे पालन करावे, कडक लॉकडाऊन करण्यास भाग पडू नये, हा शेवटचा इशारा आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

आज ते आहार, नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन, शॉपिंग सेन्टर्स असोसिएशन यांच्या प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन संवाद साधला व सहकार्याचे आवाहन केले. यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी, डॉ. तात्याराव लहाने, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी उपस्थित होते.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, गेल्या ४ महिन्यात सर्व व्यवस्थित होत होते. आपल्याच राज्यात नव्हे तर अगदी युरोपमध्ये सुद्धा जणू काही कोरोना गेल्यासारखं सर्व व्यवहार मोकळेपणाने सुरु झाले होते. मात्र अचानक सर्वत्रच संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून तिकडे ब्राझीलमध्ये भयानक स्थिती झाली आहे. आपल्याला युरोपसारखी परिस्थिती होऊ द्यायची नसेल तर काटेकोरपणे आरोग्याचे नियम पाळावे लागतील.

स्वयंशिस्त खूप महत्त्वाची -
पुढच्या काळात देखील आपल्याला कोविडबरोबरच जगायचे असून जीवनपद्धती त्याला अनुरूप करावी लागेल. बंदी आणि स्वयंशिस्त यात फरक असून सर्वांनी याचे भान ठेवावे असेही ते म्हणाले.

मागील वर्षी विशेषत्वाने झोपडपट्टीत मोठ्या प्रमाणावर संसर्ग दिसू लागला होता. यावेळी मात्र तो इमारती, बंगले, सोसायट्यांमध्ये दिसतो आहे. याचे कारण म्हणजे समाजातील या वर्गाचे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना भेटणे, हॉटेलिंग, मॉल्समध्ये जाणे सुरु झाले आहे, त्यामुळे परिवारातल्या सर्व सदस्यांत एकदम फैलाव होत आहे.

मागील आठवड्यात केंद्रीय पथक मुंबईत आले असता एका हॉटेलमध्ये कोणत्याही कर्मचाऱ्यांनी मास्क न घातलेला व सुरक्षित अंतर न पाळता गर्दी झाल्याचा अनुभव आला असल्याचे त्यांनी आपणास सांगितले. हॉटेल्स आणि उपाहारगृहे हे भेटीगाठी व जेवण-नाश्त्याचे प्रमुख ठिकाण असून सुरुवातीच्या काळात नियमांचे पालन होताना दिसत होते. हॉटेल्समध्ये समोरासमोर न बसवता सुरक्षित अंतर ठेऊन बसविणे, वेटर्स आणि इतर कर्मचारी यांनी मास्क घालणे, जंतुनाशक फवारणी असे होत होते. पण राज्यभरात आता काही हॉटेल्स, मॉल्स, उपाहारगृहांत नियमांची पायमल्ली होऊन वातावरण सैल झाल्यासारखे प्रशासनाला दिसत आहे. अजूनही परिस्थिती आपल्या हातात आहे, आपण स्वत:हून आमच्या एसओपीचे पालन नीट व काटेकोरपणे झालेच पाहिजे हे पहा. सर्वजण नियम धुडकावत आहेत असे नाही, पण काही नियम न पाळणाऱ्यांमुळे धोका वाढतोय असेही ते म्हणाले. लॉकडाऊन लावून सगळे बंद करणे आम्हालासुद्धा आवडत नाही. आपण हे अर्थचक्र सुरु केले आहे, सर्वांनी सहकार्य केले तर संसर्ग रोखता येईल, त्यामुळे लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध लावण्यास भाग पडू नका, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

नियम तोडत असतील तर कारवाई करा -
पालिका आणि पोलीस प्रशासनाने देखील यासंदर्भात राज्यातील सर्व हॉटेल्स व उपाहारगृहे काटेकोर पालन करतात किंवा नाही तसेच नियम तोडत असतील तर कारवाई करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी देखील सांगितले की, एकीकडे आम्हाला कोरोनाला पूर्णपणे रोखायचे आहे, पण असे करताना अर्थचक्रही सुरूच ठेवायचे आहे. हे संतुलन राखण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची खूप गरज आहे. १ फेब्रुवारीपासून कोरोना वाढतोय. आज सुमारे १५००० रुग्ण दिवसाला सापडले आहेत तर, १ लाख १० हजार सक्रिय रुग्ण राज्यात झाले आहेत. या वेगाने १५ एप्रिलपर्यंत २५ हजार रुग्ण दिवसाला आढळतील, त्यामुळे गर्दीचे नियंत्रण ठेवणे व सुरक्षित अंतर राखणे गरजेचे आहे हे सांगताना त्यांनी सिद्धीविनायक मंदिरात तंत्रज्ञांच्या उपयोगाने गर्दीचे कसे व्यवस्थापन केले आहे त्याचे उदाहरण दिले.

पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी यावेळी सूचना केली, की हॉटेल्स संघटनांनी प्रत्येक प्रभागात त्यांची फिरती पथके तयार करून नियमांचे पालन होते आहे किंवा नाही ते तपासावे. सर्व पदाधिकाऱ्यांची तत्काळ बैठक घेऊन त्यांना जाणीव करून द्यावी. एक स्टार किंवा दोन स्टार तसेच लहान उपाहारगृहांत नियम पाळत नसल्याचे दिसून येते असेही ते म्हणाले.

याप्रसंगी हॉटेल्स आणि उपाहारगृहे यांच्या संघटनांच्या वतीने गुरुबक्षसिंग कोहली, सुभाष रुणवाल, शिवानंद शेट्टी, श्री. रहेजा आदींनी शासनाला संपूर्ण सहकार्य करण्याचे तसेच प्रसंगी एसओपी न पाळणाऱ्या उपाहारगृहांना संघटनेतून काढून टाकण्याची कार्यवाही केली जाईल, असे आश्वस्त केले. मॉल्समध्ये ४० ते ५० हजार लोक दररोज येतात, तेथे देखील कोविड मार्शल्स मास्क न घालणाऱ्याना दंड करतील व फूड कोर्टमध्ये देखील संख्या मर्यादित ठेवू, थर्मल इमेजिग, संपर्काशिवाय पार्किंगचे देखील पालन केले जाईल, असे संघटनांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom