वि. प.च्या १२ सदस्यांचा निर्णय कधी? हायकोर्टाची राज्यपाल सचिवांना विचारणा

Anonymous
0


मुंबई - राज्याच्या विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त १२ सदस्यांच्या नियुक्तीच्या वादावर मुंबई हायकोर्टाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या सचिवांना विचारणा केली आहे. राज्य मंत्रिमंडळाने शिफारस केलेल्या विधान परिषदेच्या १२ सदस्यांच्या नावांवर निर्णय केव्हा घेणार?, असा सवाल हायकोर्टाने केला आहे. हायकोर्टाच्या या भूमिकेनंतर आता या प्रकरणी लवकरच तोडगा निघण्याची शक्यता असल्याचे समजते.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात राज्य मंत्रिमंडळाने १२ जणांच्या नावांची शिफारस राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे केली होती. पण त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. राज्यपालांच्या भूमिकेवरुन राजकीय पडसाद देखील उमटल्याचे पाहायला मिळाले. राज्यपालनियुक्त सदस्यांच्या नियुक्तीवरुन होणाऱ्या दिरंगाईवरुन महाविकास आघाडीचे नेते आणि मंत्री यांनीही विधानसभेत टीका केली होती.

विधान परिषदेच्या या रिक्त जागांसाठी नियुक्ती करण्याचा अधिकार घटनेने राज्यपालांना दिला आहे. पण ही नियुक्ती करत असताना मुख्यमंत्र्यांचा सल्ला घेण्यात यावा असेही घटनेत स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राज्यपाल आमदार नियुक्त करण्याची प्रक्रिया करणे अपेक्षित आहे. पण अंतिम निर्णय घेण्याचे सर्वस्वी अधिकार राज्यपालांकडे असतात.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)