कोविशिल्डच्या दोन डोसमधील कालावधी आता 12 ते 16 आठवड्यांचा

Anonymous
0


मुंबई - देशभरात लसीकरण मोहिमेला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तिस-या टप्प्यातील लसीकरण भारतात सुरू असताना, आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसीकरणाच्या बाबतीत महत्त्वाची माहिती दिली आहे. कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील कालावधी वाढवण्यात आल्याचे, आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. कोविशिल्डच्या दोन डोसमधील कालावधी आता 12 ते 16 आठवड्यांचा करण्यात आला आहे.

डॉ. एन के अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या, कोविड कार्यगटाच्या शिफारशीवरुन हा कालावधी वाढवण्यात आला आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर आता 6 ते 8 आठवड्यांवरुन 12 ते 16 आठवडे करण्यात आले आहे. युके मध्ये आढळलेल्या काही प्रत्यक्ष पुराव्यांच्या आधारे कोविशिल्डचा दुसरा डोस 12 ते 16 आठवड्यांनंतर घेतल्यास, जास्त प्रभावी ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कोविड कार्यगटाने हा निर्णय घेतल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या बाबतीत मात्र, कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.

कोविड कार्यगटाकडून करण्यात आलेली ही शिफारस, व्ही. के. पॉल यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेल्या कोविड-19 लसीकरण तज्ज्ञ गटाने मान्य केली आहे. पॉल हे केंद्र सरकारच्या नीती आयोग आरोग्य विभागाचे सदस्य आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुद्धा, कोविशिल्ड लसीच्या बाबतीत वाढवण्यात आलेल्या सुधारित कालावधीला मान्यता दिली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)