चार महिन्यांनंतर धारावीतील रुग्णसंख्या शून्यावर

Anonymous
0


मुंबई - आशियातील सर्वात मोठ्या समजल्या जाणा-या धारावी झोपडपट्टीत कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेला यश आले आहे. दुस-या लाटेत तब्बल चार महिन्यांनंतर मागील २४ तासांत एकही रुग्ण आढळला नाही. त्यामुळे धारावीची कोरोनामुक्तीच्या दिशेने चाललेली वाटचाल धारावीकरांना दिलासा देणारी आहे.

मुंबईत गेल्यावर्षी कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर धारावी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरली होती. मात्र पालिकेच्या प्रभावी उपाययोजनांमुळे रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी पालिकेला यश आले. विस्तारलेल्या दाटीवाटीच्या झोपडपट्टीत पसरलेल्या कोरोनाला रोखण्यात पालिकेला यश आले. राबवण्यात आलेल्या धारावी मॉडेलचे जगभरात कौतुकही झाले. पहिल्या लाटेत धारावीत सहावेळा रुग्णांची संख्या शून्यावर आली. त्यानंतर फेब्रुवारीच्या मध्यानंतर कोरोनाच्या दुस-या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. यावेळी धारावीतही कोरोनाने पुन्हा शिरकाव केला. रोज रुग्णांची संख्या ७० ते ८० वर पोहचली. मात्र पालिकेने येथे पुन्हा यंत्रणा कामाला लावली. घरोघरी सर्वेक्षण, चाचण्यांची संख्या वाढवली. आरोग्य शिबिरे, कंटेनमेंट झोन, क्वारंटाईनचे नियमांची अमलबजावणी, जनजागृती, उपचार पद्धती आदी उपाययोजनांमुळे धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात राहिली. आठ - दहा दिवसांपूर्वी दोन आकडी रुग्णसंख्या असलेल्या धारावीतील संख्या एका आकड्यावर आली. आता दुस-या लाटेत मागील चार महिन्यांनंतर पहिल्यांदाच येथे एकही रुग्ण आढळला नाही. त्यामुळे धारावी मॉडेल पुन्हा यशस्वी ठरले असून धारावीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)