Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

कोरोना तिसर्‍या लाटेचा इशारा, राज्यात निर्बंध राहणार कायम



मुंबई - देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसर्‍या लाटेचा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनने दिला आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका पाहता राज्यात कोरोना रोखण्यासाठीच्या नियमांमध्ये कोणतीही सूट दिली जाणार नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुंबईकरांना आताही रेल्वे प्रवासाची मुभा मिळण्याची शक्यता निवळली आहे.

दुकाने आणि प्रवासाच्या नियमात कोणतेही बदल होणार नाहीत. केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त लसी मिळवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असून राज्यात जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्यावर आमचा भर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ऑगस्ट महिन्यात ४ कोटी लसी उपलब्ध होतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. सध्या राज्यात होणारा लसींचा पुरवठा हा कमी असल्याचे त्यांनी सांगितले. हा पुरवठा वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. उर्वरित २६ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि नगरमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र, दोन डोस घेतलेल्या महाराष्ट्राबाहेरील व्यक्तींना राज्यात थेट प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी आरटीपीसीआर टेस्टची गरज नसल्याचे टोपे म्हणाले.

संपूर्ण राज्यामध्ये लेव्हल तीनचे निर्बंध लागू राहणार असून निर्बंध शिथील करण्यासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोविड परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. मात्र, अद्याप निर्बंध शिथील करण्यासंदर्भात कोणताही निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात अद्याप डेल्टा प्लसचा कोणताही नवीन रुग्ण आढळलेला नाही. डेल्टा प्लससंदर्भात तपासणी प्रत्येक तालुक्यात सुरू असून प्रत्येक तालुक्यातून शंभर नमुने तपासण्यात येत आहेत. मात्र, पूर्वी आढळलेल्या एकवीस रुग्णांव्यतिरिक्त कोणताही नवीन रुग्ण राज्यांमध्ये आढळलेला नसल्याचे टोपे यांनी म्हटले आहे.

निर्बंध पुन्हा लागू करण्याच्या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राज्यांना सूचना -
कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरताना दिसत असली तरी तिसर्‍या लाटेचा धोका कायम आहे. मात्र नागरिक कोणाची पर्वा न करता सार्वजनिक ठिकाणी, पर्यटनस्थळी, बाजारपेठांमध्ये, कार्यक्रमांमध्ये वावरताना दिसत आहेत. त्यामुळेच केंद्रीय गृह मंत्रालयाने कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पाश्र्वभूमीवर निर्बंध पुन्हा लागू करण्याच्या सूचना राज्यांना दिल्या आहेत. राज्यांचे मुख्य सचिव आणि वरिष्ठ अधिकार्‍यांना केंद्रीय गृह मंत्रालयाने पत्र पाठवत कोरोना संबंधीचे नियम पाळण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोना प्रतिबंधासाठी ठरवलेले मानक व एसओपी लागू केले पाहिजेत. सार्वजनिक ठिकाणे आणि बाजारपेठांमध्ये होत असलेल्या गर्दीवर लक्ष ठेवले पाहिजे आणि बेजबाबदारपणा असेल तिथे परिस्थितीनुसार कडक कारवाईचे निर्देश गृह मंत्रालयाने दिले आहेत.

तूर्तास लोकल प्रवास बंदीच – काकाणी
कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका व ऑगस्ट महिन्यापासून येणारे सण पाहता मुंबईकरांची लाईफलाईन सुरु करणे म्हणजे आतापर्यंत कोरोनाला हरवण्यासाठी घेतलेले परिश्रम व्यर्थ ठरणारे आहे. त्यात एमएमआर रिजन म्हणजेच, पनवेल, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मिरा र्भाइंदर, वसई या परिसरात कोरोनावर हवे तसे नियंत्रण आलेले नाही. मुंबईत कोरोना नियंत्रणात आला असला तरी मुंबईबाहेरील ३० ते ३५ लाख प्रवासी मुंबईत कामानिमित्त येत असतात. लोकल सर्वांसाठी सुरु केल्यास कोरोना रुग्ण वाढीचा धोका टाळणे शक्य नाही. त्यामुळे तूर्तास तरी सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सुरू करणे शक्य नाही, अशी भूमिका मुंबई महापालिकेची असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom