पालिका कर्मचा-यांना २५ ते ५० हजार रुपये बोनस द्या - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिका कर्मचा-यांना २५ ते ५० हजार रुपये बोनस द्या

Share This


मुंबई - दिवाळी काही दिवसांवर आली असल्याने पालिकेत बोनसची चर्चा सुरु झाली आहे. पालिकेचे कर्मचारी व अधिका-यांनी कोरोनाच्या संकटात जीव धोक्यात घालून काम केले आहे. त्याची शाबासकी म्हणून कर्मचा-यांना २५ ते ५० हजार रुपये बोनस मिळायला हवा अशी मागणी पालिकेतील कामगार संघटनांनी केली आहे.

दरवर्षी दिवाळीपूर्वी काही दिवस आधी कर्मचा-यांना बोनसची घोषणा केली जाते. या पार्श्वभूमीवर विविध कामगार संघटनांकडून बोनसच्या मागण्यांचे पालिका आयुक्त, महापौरांना पत्र दिले जाते. यावेळी दरवर्षीपेक्षा वाढवून बोनस देण्याची मागणी केली जाते. मागील वर्षी २०२०-२१ मध्ये पालिकेच्या कायम कर्मचा-य़ांना १५ हजार ५०० रुपये बोनस देण्यात आला होता. तर अनुदानप्राप्त खासगी शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ७,७५०, पालिका प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवकांना ४,७०० आणि अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षणांना २,३५० रुपये बोनस देण्यात आला होता. आरोग्यसेविकाना भाऊबीज म्हणून ४ हजार ४०० रुपये देण्यात आले होते.

कोरोना काळात पालिका कर्मचा-यांनी जीव धोक्यात घालून काम केले आहे. सेवा देताना अनेक कर्मचा-यांना कोरोनाची लागणी झाली. यात काहींना जीव गमवावा लागला आहे. कर्मचा-यांनी केलेल्या अथक मेहनतीची शाबासकी म्हणून पालिकेने यंदा अधिकाधिक बोनस देण्याची मागणी कामगार संघटनांनी केली आहे. दि म्युनिसिपल युनियनने २० टक्के म्हणजे सुमारे ५० हजार रुपये तर बृहन्मुंबई महापालिका कार्यालयीन कामगार, कर्मचारी संघटनेने २५ हजार रुपये बोनसची मागणी केली आहे.

प्रशासनाने कर्मचा-यांची कोरोना संकटातील सेवा लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, असे म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी सांगितले. दिवाळी बोनसबाबत लवकरच कामगार संघटनांशी पालिका आयुक्त चर्चा करणार असल्याचे कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अॅड. प्रकाश देवदास यांनी सांगितले.

ليست هناك تعليقات:

إرسال تعليق

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages