
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी नऊ वाजता देशवासियांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत त्यांनी तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा केली आहे. कायद्याच्या ज्या तरतुदीवर शेतकऱ्यांचा आक्षेप होता, तो बदलायला आम्ही तयार होतो. आम्ही दोन वर्षासाठी कायदे तहकूब करण्याचाही निर्णय घेतला. मी देशाची क्षमा मागून पवित्र मनाने हे सांगतो, की आमच्या तपस्येत काहीतरी कमतरता राहिली असेल. आम्ही दिव्यासारखे प्रकाशमान सत्य काही शेतकऱ्यांना समजवू शकलो नाही. आज प्रकाशपर्व आहे. यावेळी कोणालाही दोष देण्याची ही वेळ नाही. आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या अखेरीस संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हे कायदे रद्द करण्याची संविधानिक प्रक्रिया पूर्ण करणार आहोत, असं मोदी म्हणाले. शेतकऱ्यांनी आता आंदोलन करू नये. त्यांनी आपआपल्या घरी जावं. शेतावर काम करावं, अशी विनंतीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाअखेरीस केली.
“कृषी कायदे शेतकरी हिताचेच” -
आमचं सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि देशाच्या हितासाठी काम करतं. संपूर्ण सत्यनिष्ठेने आणि शेतकऱ्यांप्रती समर्पण भावनेने चांगली नियत ठेवून आम्ही हे कायदे आणले होते. शेतकऱ्यांच्या हिताचे हे कायदे होते. देशाच्या कानाकोपऱ्यातून या कायद्याचं स्वागत आणि समर्थन झालं, त्यांचे आम्ही आभार मानतो. मात्र एक वर्ग विरोध करत होता. ते आमच्यासाठी महत्त्वाचं होतं. अनेकांनी त्यांना या कायद्याचं महत्त्व सांगण्याचा प्रयत्नही केला. आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. आम्ही काही शेतकऱ्यांना समजावण्यात कमी पडलो. त्यांचं म्हणणं आणि तर्कही जाणून घेतला. त्यात कसूर ठेवली नाही, असंही मोदी म्हणाले.
वादग्रस्त कृषी कायदे -
1 कृषी उत्पादने,व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) कायदा 2020
2 हमी भाव व कृषी सेवांचा शेतकरी (सक्षमीकरण व संरक्षण ) करार कायदा 2020
3 जीवनावश्यक वस्तू (सुधारणा) कायदा 2020