Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

विधान परिषद निवडणूक - भाजपची भिस्त आयाराम नेत्यांवर



मुंबई - महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या (Maharashtra Legislative Council Election) पाच जागांसाठी डिसेंबरमध्ये निवडणुका होत आहेत. यासाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा (BJP Candidates) करण्यात आली आहे. भाजपने कोल्हापूर, नागपूर, धुळे-नंदुरबार, अकोला-बुलडाणा-वाशिम आणि मुंबई अशा पाच पैकी धुळे नंदुरबार मतदारसंघातून अमरिश पटेल (Amrish Patel), मुंबईतून राजहंस सिंग (Rajhans Dhananjay Singh) आणि कोल्हापूर मतदारसंघातून अमल महाडिक (Amal Mahadik) यांना उमेदवारी दिली आहे. हे तीनही उमेदवार काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेले आहेत. यावरून भाजपची भिस्त आयाराम नेत्यांवर दिसत आहे.

राजहंस सिंग -
राजहंस सिंग हे 1992 मध्ये सर्वप्रथम मुंबई महापालिकेच्या नगरसेवक पदी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. वर्ष 1992 ते 1997 या काळात ते नगरसेवक होते. नंतर 2002 पासून 2012 पर्यंत सलग बारा वर्षे ते नगरसेवक होते. या कालावधीत 2004 पासून 2012 पर्यंत सलग आठ वर्ष त्यांनी विरोधी पक्ष नेता म्हणून पालिकेत कामगिरी बजावली आहे. याच दरम्यान 2009 मध्ये मुंबईतील दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून आले. 2009 ते 2014 ते विधानसभा सदस्यही होते. 2017 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. तेव्हापासून आजपर्यंत मुंबई भारतीय जनता पक्षाचा उत्तर भारतीय चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

अमल महाडिक -
कोल्हापूर विधानपरिषद मतदारसंघातून भाजपकडून अमल महाडिक यांना संधी मिळाली आहे. त्यामुळे पुन्हा काँग्रेसचे सतेज पाटील विरुद्ध भाजपचे अमल महाडिक असा सामना रंगणार आहे. 2014 मध्ये कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात अमल महाडिक विरुद्ध सतेज पाटील अशी लढत झाली होती. त्यावेळी अमल महाडिक यांनी सतेज पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर सतेज पाटील कोल्हापूर स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून गेले होते.कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून अमल महाडिक यांनी काम केलं आहे. ते शिरोली मतदारसंघातून काँग्रेसमधून विजयी झाले होते. सतेज पाटील आणि महाडिक वादामुळे अमल महाडिक यांची जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी हुकली. इथूनच पाटील महाडिक गटांमधील संघर्षाची धार आणखी वाढली. त्यानंतर सतेज पाटील यांचा अनपेक्षित पराभव करुन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत अमल महाडिक भाजपकडून आमदार झाले. आपल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदेवेळी केलेल्या विरोधाचा वचपा त्यांनी सतेज पाटील यांचा पराभव करून काढला होता. 2019 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा त्यांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवली, यात सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांनी त्यांचा पराभव केला.

अमरिश पटेल -
अमरिश पटेल हे मूळचे काँग्रेसचे. त्यांनी आपली राजकीय कारकीर्द एक स्वतंत्र राजकारणी म्हणून शिरपूरमध्ये सुरू केली आणि शिरपूर नगरपालिकेचे अध्यक्ष, चार वेळा (1990 ते 2009) शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेससाठी काम केले. काँग्रेसचा उमेदवार, जो कधीही विधानसभा निवडणूक हरला नाही, असा त्यांचा लौकिक. राज्य सरकारचे कॅबिनेट मंत्री म्हणूनही त्यांनी पद भूषवले. अमरिश पटेल यांनी शालेय शिक्षण, संस्कृती, क्रीडा कॅबिनेट मंत्री म्हणूनही काम केले होते. व युवक कार्य (महाराष्ट्र शासन) 2003-04 मध्ये तसेच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहिले. 2009 मध्ये, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार म्हणून त्यांना महाराष्ट्र विधान परिषदेचे बिनविरोध निवडून आलेले सदस्य घोषित करण्यात आले. गेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यापूर्वी त्यांना विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला. अमरिश पटेल यांनी 30 सप्टेंबर 2019 रोजी राजीनामा दिल्यामुळे, विधानपरिषदेची त्यांची जागा रिक्त झाली. खरं तर अमरिश पटेल यांनी राजीनामा दिला नसता तर त्यांचा कार्यकाळ 14 डिसेंबर 2021 पर्यंत होता. पण राजीनाम्यामुळे पुन्हा निवडणूक लागली. ही निवडणूक मार्च 2020 मध्ये नियोजित होती, पण कोरोना संकटामुळे ती पुढे ढकलली. ही निवडणूक डिसेंबर 2020 मध्ये पार पडली आणि केवळ 12 महिन्यांसाठी निवडणूक लागली.

إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom