Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

मधुमेह ग्रस्त नागरिकांसाठी पालिकेची उद्याने ठरताहेत संजीवनीमुंबई - मुंबई महानगरासारख्या अत्यंत घनदाट लोकसंख्येच्या, अरुंद वसाहतींच्या शहरात मधुमेह व तत्सम आजाराने ग्रस्त नागरिकांना व्यायाम, चालणे, धावणे यासारख्या आरोग्यदायी सेवा सुविधा मिळाव्यात म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) (MCGM) उद्यान विभागाने सुमारे ४८८ खुल्या ठिकाणी व्यायामाची साधने उपलब्ध करून दिली आहेत. बहुतांश उद्यानांमध्ये (Gardens) जॉगिंग ट्रॅक, पदपथ, योगा व ध्यानधारणा केंद्र यासारख्या सुविधा विनामूल्य उपलब्ध असल्याने मधुमेह ग्रस्त नागरिकांसाठी त्या संजीवनीच ठरत आहेत.

दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस जगभरात जागतिक मधुमेह दिवस म्हणून साजरा केला जातो. मधुमेह हा दीर्घकालीन आजार असून तो बळावला तर आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. कोणत्याही विशिष्ट वयोगटापर्यंत सीमित न राहता हा आजार आता सर्व वयोगटात आढळतो. मधुमेहाची लक्षणे दिसू लागताच जागरूक होऊन आवश्यक ती काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. योग्य आहारासोबत नेटकी जीवनशैली व दिनचर्या तसेच दररोज चालणे, धावणे यासह वैद्यकीय तज्ञांनी सुचवलेले व्यायाम करणे हे महत्त्वाचे ठरते.

सन २०२१-२०२३ या कालावधीकरिता मधुमेह विषयक काळजीसाठी आवश्यक सेवा उपलब्ध होणे, ही संकल्पना जगभरात राबविण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून मधुमेह संदर्भात व्यापक जनजागृती करून मधुमेह ग्रस्त रुग्णांना निरनिराळ्या वैद्यकीय सेवा दिल्या जातातच. त्यासोबत उद्यान विभाग देखील यामध्ये महत्वाचे योगदान देत आहे. मुंबईसारख्या महानगरात जवळपास सर्वच नागरिकांचा जीवनक्रम अत्यंत धावपळीचा व दगदगीचा असतो. त्यातच महानगराच्या भौगोलिक मर्यादांमुळे प्रत्येकाला व्यायामाच्या सेवा-सुविधा मिळतातच, असे नाही. अशा स्थितीत महानगरपालिका प्रशासनाने उद्यान विभागाच्या माध्यमातून सर्वसामान्य मुंबईकरांसाठी सर्व परिसरांमध्ये उद्याने, खेळाची मैदाने, मनोरंजन मैदाने यांच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

सद्यस्थितीत उद्यान विभागाच्या अखत्यारित एकूण १ हजार ०६८ भूभाग आहेत. मागील चार ते पाच वर्षांपासून विविध उद्याने, मनोरंजन मैदाने आणि खेळांची मैदाने येथे खुली व्यायामाची उपकरणे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आजपर्यंत सुमारे ४८८ ठिकाणी अशी उपकरणे लावण्यात आली आहेत. त्यात आणखी वाढ करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत.

पालिकेच्या बहुतांश मैदानात उपकरणे -
महानगरपालिकेच्या बहुतांश उद्यानांचा, मैदानांचा विकास करताना व्यायामाच्या उपकरणांसह जॉगिंग ट्रॅक, पदपथ, योगा आणि ध्यानधारणा केंद्र यांचाही आवर्जून समावेश केला जात आहे. जेणेकरून नागरिकांना सकाळ-सायंकाळ चालणे, धावणे यासारखे आरोग्यदायी फायदे विनामूल्य व घराजवळ सहजरित्या उपलब्ध झाले पाहिजेत. शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे अशा तीन विभागांमध्ये सर्वत्र या सुविधा नागरिकांना उपलब्ध होतील, याकडे लक्ष दिले जात आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Bottom