कोरोनाचे दूत बनून इतरांचे आरोग्य धोक्यात आणू नका - मुख्यमंत्री

0


मुंबई - वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी लागू केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. संसर्गाला लवकरात लवकर थोपवणे गरजेचे आहे. अन्यथा आपल्या आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण येऊ शकतो. याचमुळे वारंवार टास्क फोर्स, केंद्रीय आरोग्य विभाग यांच्याशी चर्चा करून राज्यात काही निर्बंध लावण्याचे ठरविल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेल्या निवेदनात उद्धव ठाकरे म्हणाले, की विषाणूशी लढतांना आपल्याला दोन वर्षे झाली आहेत. या काळात आपण संसर्गाचा मोठ्या दोन लाटा अनुभवल्या आणि काळजीपूर्वक पावले उचलत त्या रोखल्यासुद्धा आहेत. मात्र, आता आपले रुप बदलून आलेल्या विषाणूच्या संसर्गाचा वेग खूप जास्त आहे, म्हणूनच तो किती धोकादायक आहे किंवा नाही यावर चर्चा न करता निर्बंध लावण्यात आले आहे.

पुढे मुख्यमंत्री म्हणाले, की मी स्पष्ट करतो की, आपल्याला कुठलाही लॉकडाऊन करून सगळे ठप्प करायचे नाही. केवळ कायदे आणि नियम करून अशा आव्हानांचा मुकाबला होऊ शकणार नाही. तर प्रत्येक नागरिकाने मग तो समाजातला कुणीही घटक असो प्रत्येकाने आता ही लढाई अंतिम आहे. हा शेवटचा घाव कोरोनावर करायचाच अशा निश्चयाने आरोग्याचे नियम पाळायचे आहेत. आपल्याला काम बंद करायचे नाही तर गर्दी बंद करायची आहे. रोजी-रोटी बंद करायची नाही. जीवन थांबू द्यायचे नाही. पण काही बंधने पाळून या विषाणूपासून राज्य कायमचे मुक्त करायचे आहे.

मी गेल्या दोन वर्षांपासून पाहत आहेत. राज्य सरकारने ब्रेक दि चेन आणि मिशन बिगीन अगेनच्या माध्यमातून वेळोवेळी नियमावल्या केल्या आणि अंमलात आणल्या आहेत. आरोग्याचे नियम पाळण्यात बहुतांश नागरिक उत्सुक होते. काही मूठभर लोकांच्या नियम न पाळण्याच्या वृत्तीमुळे आणि बेजबाबदार वागण्यामुळे प्रश्न निर्माण होतो. हे यापुढे चालणार नाही. नियम पाळलेच पाहिजेत अन्यथा संबंधितांवर कडक कार्यवाही करण्याचे निर्देश सर्व यंत्रणांना आणि पोलिसांना दिले आहेत. हे सर्व आपल्या भल्यासाठीच आहे. लवकर या विषाणूच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी आहे, हे लक्षात घ्या.

आज आरोग्य यंत्रणेवर ताण यायला सुरुवात झाली आहे, हे नाकारता येत नाही. रुग्ण संख्या याच वेगाने वाढली तर सहव्याधी असलेल्या किंवा अद्याप लस न घेतलेल्या रुग्णांना मोठ्या प्रमाणावर रुग्णालयात दाखल करावे लागून ऑक्सिजनची मागणीदेखील वाढू शकते. आज अनेक ठिकाणी आपले डॉक्टर्स, परिचारिका, वैद्यकीय क्षेत्रातील फ्रंटलाइनर्स हे विषाणूच्या संसर्गामुळे आजारी पडलेले दिसत आहेत. हा आपल्यासाठी इशारा आहे. आपल्याकडे साधन सामुग्री पुरेशी आहे. दोन वर्षात आपल्या सुविधांमध्ये वाढ केली आहे. पण डॉक्टर्स आजारी पडले तर नवे मनुष्यबळ कुठून आणणार? हे आव्हान आपल्याकडेच आहे, असे नाही. तर देशात इतरत्र आणि काही देशांतदेखील यामुळे समस्या निर्माण झाली आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे माझे अतिशय कळकळीचे आव्हान आहे की नियम पाळा. सरकारने घालून दिलेले निर्बंधांना तोडू नका सर्वात महत्वाचे म्हणजे कोणताही धोका न पत्करता थोडी जरी लक्षणे आढळली तर आपल्या डॉक्टर्सना दाखवा किंवा त्यांचा सल्ला घ्या. \

आपण शाळा- महाविद्यालये परत ऑनलाईन केली आहेत. शिक्षण थांबणार नाही, याची काळजी घेतली आहे. त्यामुळे आपल्याला मिळालेली ही सुट्टी आहे, असे समजून इकडे तिकडे अनावश्यक फिरू नका. कोरोनाचे दूत बनू नका, असेही आवाहन मी माझ्या तरुण मित्रांना करतो.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)