Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

ताडदेव येथील कमला इमारतीत अग्नितांडव - ६ जणांचा होरपळून मृत्यू


मुंबई - ताडदेव येथील ग्वालिया टँक जवळच्या कमला या २० मजली इमारतीच्या १९ व्या मजल्यावर शनिवारी सकाळी पावणे सातच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत ६ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर २३ जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील सात जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर सुमारे पाच तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. दरम्यान इमारतीतील अग्निशमन यंत्रणा कार्यरत नसल्याचे समोर आले आहे. चौकशीनंतर संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नाना चौक, ग्वालिया टँक येथे कमला ही तळ अधिक २० मजली इमारत आहे. सकाळी साडेसहाच्या सुमारास लागलेली ही आग क्षणात भडकत गेली. त्यामुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरली. जीव वाचवण्यासाठी काही रहिवाशांनी तात्काळ इमारतीबाहेर धाव घेतली. अग्निशमन दल, स्थानिक नागरिकांनी रहिवाशांना सुखरुप बाहेर काढले. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर तब्बल पाच तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. रहिवाशांनी जीव वाचवण्यासाठी इमारतीबाहेर धाव घेतली. यात अनेकजण गुदमरल्याने इमारतीत काहीवेळ अडकले. अग्निशमन दलाला माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरु केले. स्थानिक रहिवाशीही मदतीला धावले. त्यामुळे इमारतीतील अनेक रहिवाशांना सुखरुप बाहेर काढता आले. मात्र यातील सहा जण आगीच्या ठिकाणी अडकून पडल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाला. तर २३ जण जखमी झाले. यातील ३ जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर नायर, कस्तुरबा, भाटिया व मसीना या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे अथक प्रयत्न सुरु होते. ७.४२ वाजता आगीची लेव्हल -३ ची म्हणजे भीषण स्वरूपाची असल्याचे जाहीर करण्यात आले. अग्निशमन दलाने आगीची भीषणता पाहता आग विझविण्यासाठी आणखी कुमक मागवली. तब्बल १३ फायर इंजिन, ७ जंबो वॉटर टँकर, १ बीए व्हॅन, ५ रुग्णवाहिका अशी यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली होती. अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी यांनी अथक प्रयत्न करून सकाळी ११. २० वाजता आगीवर नियंत्रण मिळविले. त्यानंतर अग्निशमन दलाने कुलिंग ऑपरेशनचे काम हाती घेतले. जखमींपैकी नायर रूग्णालयात ७ जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले ; मात्र त्यापैकी ५ जणांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. तर कस्तुरबा रुग्णालयात दोन जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यातील एकाचा मृत्यू झाला. तसेच, भाटिया रुग्णालयात दाखल केलेल्या १७ जणांपैकी ३ जणांची प्रकृती गंभीर असून ७ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर मसीना रुग्णालयात एकजण उपचार घेत असून त्याची प्रकृती स्थिर आहे. आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. इमारतीमधील अग्निरोधक यंत्रणा वेळीच कार्यान्वित झाली नाही, याबाबत स्थानिक पोलीस, अग्निशमन दल यांच्यामार्फत चौकशी सुरू आहे.

इमारतीतील अग्निशमन यंत्रणा कार्यरत नव्हती -
कमला इमारतीत लागलेल्या आगीनंतर येथील अग्निशमन यंत्रणा कार्यरत नसल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारच्या हायराईज इमारतीत अग्निशमन यंत्रणा कार्यरत असणे आवश्यक आहे. मात्र आग लागली त्यावेळी येथील अग्निशमन यंत्रणा काम करू शकली नाही. याबाबतची चौकशी केली जाणार असून नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

... त्या तीन रुग्णालयांवर होणार कारवाई
आगीत जखमी झालेल्या रुग्णांना वॉक्टार्ड, रिलायन्स आणि मसिना या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले असता त्यांना दाखल करून घेण्यास संबंधित रुग्णालयांनी नकार दिला. याबाबत संताप व्यक्त केला जातो आहे. संबंधित रुग्णालयाची दखल शासन पातळीवर घेण्यात आली असून याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Bottom