Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

चवदार तळे ऊर्जा स्रोतच, बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार करण्याचा प्रयत्न



अलिबाग, दि.20 - जातीयवादाची दरी संपुष्टात यावी, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करून सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अधिकाधिक प्रसार करण्याचा प्रयत्न पालकमंत्री या नात्याने माझ्याकडून आणि शासनाकडून निश्चितच केला जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आज महाड येथे केले.

चवदार तळे सत्याग्रह या ऐतिहासिक घटनेच्या स्मृतीनिमित्त आज चवदार तळे सत्याग्रहाचा 95 वा वर्धापनदिन महाडमध्ये साजरा करण्यात आला, त्या कार्यक्रमानिमित्त पालकमंत्री आदिती तटकरे बोलत होत्या. यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही चवदार तळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले.

पालकमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, 20 मार्च 1927 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड मधील चवदार तळे येथे पाण्याचा सत्याग्रह केला. तो केवळ अस्पृश्यांना पिण्याचे पाणी खुले करून देण्यासाठी दिलेला लढा नव्हता तर त्यांच्या मूलभूत न्याय्य हक्कासाठी दिलेला लढा होता. जुलै 2021 महिन्यात आलेल्या महापूरात चवदार तळेही वाचले नाही. त्यानंतर चवदार तळ्याची साफसफाई करण्यासाठी स्थानिक प्रशासन, महाड नगरपालिका व ठाणे महानगरपालिकेचे मोठे योगदान होते. चवदार तळ्यातील पाणी शुद्धीकरणासाठी जी यंत्रणा बसविण्यात आली आहे, त्याचे उद्घाटन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते लवकरच केले जाणार आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अधिकाधिक प्रसारित करण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जाईल.

चवदार तळे हे उर्जा स्तोत्रच - गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड
यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, माणसाला माणूस म्हणून जगता यावे, त्याला पाण्यापासून वंचित ठेवता येणार नाही, हा संदेश चवदार तळे सत्याग्रहाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला दिला गेला. म्हणून चवदार तळे हे उर्जा स्तोत्र आहे.

ते म्हणाले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दि. 20 मार्च 1927 रोजी पुकारलेला लढा हा माणुसकी नसलेल्या समाज व्यवस्थेविरोधातील अजरामर लढा होता. या लढ्याच्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संरक्षणासाठी महाड मधील काही सवर्ण पुढे आले आणि त्यांनी आजूबाजूच्या परिसरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर हल्ला करण्यासाठी जे सनातनी आले होते, त्यांना परतवून लावले. हा भारताच्या इतिहासातील टर्निग पॉईंट ठरला होता. अन्याय-अत्याचाराविरोधात आवाज उठविलाच पाहिजे, हे बाबासाहेबांनी त्या काळी सांगितले. अस्पृश्य समाजाला समाज व्यवस्थेमध्ये पाणीही पिऊ द्यायचे नाही, या माणुसकीहीन संस्कृती व्यवस्थेविरोधात उभारलेला हा लढा होता.

या वर्धापन दिनानिमित्त दि.19 मार्चपासूनच हजारो अनुयायी महाडमध्ये दाखल झाले. सकाळपासूनच चवदार तळ्यातील पाणी प्राशन करण्यासाठी तसेच चवदार तळे व क्रांती स्तंभावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी हजारो भीमसैनिक, आंबेडकर प्रेमी, राजकीय नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने जमले होते. येथे जमलेल्या डॉ.आंबेडकर यांच्या अनुयायींसाठी अल्पोपहार, जेवण, पाणी, वैद्यकीय सुविधा याची उत्तम व्यवस्था चवदार तळे विचार मंच महाड, पोस्ट कर्मचारी संघटना तसेच विविध शासकीय, अशासकीय यंत्रणा, सामाजिक संघटना, संस्थांच्या वतीने करण्यात आली होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom