पालिका शाळेतील मुलांना मिळणार आर्थिक साक्षरतेचे धडे !

Anonymous
0

मुंबई  - मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये बहुतांश मुले आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत. ही बाब लक्षात घेऊन या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचा भविष्यात आर्थिक स्तर उंचावण्यासाठी ‘आर्थिक साक्षरता मिशन’ उपक्रम राबवला जाणार आहे. राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमांतर्गत शालेय जीवनातच इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरतेचे धडे देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. 

राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारत आहे. या मिशनसाठी सोमवारी, ११ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या सभागृहामध्ये, महानगरपालिका आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इन्स्टिट्यूट लि. यांच्यात सामंजस्य करार होणार आहे. यावेळी मुंबई उपनगराचे  पालकमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत. या उपक्रमांतर्गत बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इन्स्टिट्यूट लि. च्या सहकार्याने महानगरपालिकेच्या इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरतेचे धडे देण्याकरिता अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्याची पुस्तिका तयार करण्यात आली आहे. या पुस्तिकेचे प्रकाशन व आर्थिक साक्षरता मिशनचा शुभारंभ यावेळी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या समारंभास महानगरपालिकेचे सहआयुक्त (शिक्षण) अजीत कुंभार, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक कुमार चौहान, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इन्स्टिट्यूट लि. चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अंबरीष दत्ता तसेच शिक्षण विभागातील अधिकारी वर्ग व मास्टर ट्रेनरसाठी निवड करण्यात आलेल्या महानगरपालिकेच्या शाळांमधील १०० शिक्षक उपस्थित राहणार आहेत. 

आर्थिक साक्षरतेचे धडे -
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इन्स्टिट्यूट लि. मार्फत १०० मास्टर ट्रेनर्सना आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मास्टर ट्रेनरच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या इतर सर्व शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाईल. या सर्व शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना येत्या जूनमध्ये सुरू होणा-या नवीन शैक्षणिक वर्षापासून आर्थिक साक्षरतेचे धडे मिळणार आहेत. सर्वसामान्य गटातील पालकांचा व देशामध्ये मुंबईचा आर्थिक स्तर उंचावला जावा यासाठी ‘आर्थिक साक्षरता मिशन’ अंतर्गत होणारा हा कार्यक्रम महत्वाचा ठरणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)