यंदाही गणेश मुर्त्यांसाठी पीओपीला बंदीच - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

यंदाही गणेश मुर्त्यांसाठी पीओपीला बंदीच

Share This


मुंबई - केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) गणेश मूर्ती खरेदी व वापरावर यंदाही बंदी असणार आहे. पीओपी मूर्ती विसर्जनामुळे जल प्रदूषण होते. त्यामुळे पर्यावरण हित लक्षात घेऊन यंदा गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसने घडवलेल्या गणेश मूर्तीची विक्री अथवा खरेदी करु नये, त्याऐवजी शाडू मातीची गणेश मूर्ती स्थापन करावी, असे आवाहन मुंबई महापालिकेने मुंबईतील सर्व गणेशोत्सव मंडळांना केले आहे. तसेच घरगुती गणेश मूर्तीची उंचीही २ फुटापेक्षा अधिक नको हा मागील वर्षीचा नियम यंदाही कायम ठेवला आहे.

कोरोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्ष गणेशोत्सवावर निर्बंध होते. सद्यस्थितीत कोरोना नियंत्रणात असल्याने यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी पालिका मुख्यालयात गणेशमंडळे व पालिका प्रशासनामध्ये बैठक झाली. या बैठकीत गणेशोत्सवाबाबत चर्चा करण्यात आली. मागील वर्षी गणेशमूर्तीची उंची व पीओपीच्या गणेशमूर्तींची खरेदी व वापरावर बंदी होती. पर्यावरणाच्‍या दृष्‍टीने आणि जल प्रदूषण रोखण्‍यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये घडवलेल्या गणेश मूर्तीची स्‍थापना करु नये. कारण, प्लास्टर ऑफ पॅरिस गणेश मूर्तीचे अनेक दुष्‍परिणाम आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिस पाण्‍यात विरघळत नाही. त्‍यामुळे अशा मूर्तीचा गाळ विहीर, तलाव आणि जलाशय यांच्या तळाशी साचतो. यामुळे जलाशयातील जिवंत झरे बंद होतात. तसेच प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तीवरील रासायनिक रंगामुळे जल प्रदूषण होऊन जलचरांना देखील धोका निर्माण होतो. त्यामुळे पीओपीची गणेशमूर्ती यंदाही खरेदी व वापरू नये असे आवाहन पालिकेने मंडळांना केले आहे. तसेच घरगुती गणेश मूर्ती ही २ फूटांपेक्षा जास्‍त उंच नसावी. तसे केल्‍याने या मूर्तींचे विसर्जन नजीकच्‍या कृत्रिम तलावामध्‍ये करणे सोयीस्कर होईल. गणेश मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात करावे, असे आवाहनही पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ليست هناك تعليقات:

إرسال تعليق

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages