राणीबागेत ३ ते ५ फेब्रुवारीला भाज्या, झाडे, पाना फुलांपासून कार्टुन्सचा लाभ घ्या

0

मुंबई - भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात यंदा मुंबई महापालिकेचे २६ वे उद्यान प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. येत्या ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान होणा-या या प्रदर्शनात पाना-फुलांपासून साकारलेल्या 'जी २०' चे बोधचिन्हासह 'जी २०' देशांमधील भाज्या, झाडे व फुलेही पाहायला मिळणार आहे. तसेच मुलांची आवडती पेपा पिग फॅमिली, माशा अँड द बियर, ब्लुई, ट्वीटी आणि सिल्व्हेस्टर यांच्यासह पानाफुलांपासून कार्टुन्स साकारली जाणार आहेत, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

मुंबई महापालिकेकडून दरवर्षी उद्यान प्रदर्शन आयोजित केले जाते. कोरोनामुळे मागील दोन वर्षाच्या खंडानंतर यंदा ३ फेब्रुवारी ते ५ फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन होत आहे. महापालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात म्हणजेच राणीच्या बागेत आयोजित होणा-या उद्यान प्रदर्शनाचे उद्घाटन महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर ५ फेब्रुवारी रोजी होणा-या समारोपीय कार्यक्रमालाही विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. लहान मुलांच्या भाव विश्वाचा भाग असणारे कार्टून्स या वर्षीच्या उद्यान प्रदर्शनाची मध्यवर्ती संकल्पना असणार आहे. या अंतर्गत पाना - फुलांपासून तयार केलेल्या विविध कार्टून्सच्या प्रतिकृती यंदाच्या उद्यान प्रदर्शनात बघता येणार आहेत. त्याचबरोबर पाना-फुलांपासून तयार केलेले अनेक 'सेल्फी पॉइंट' देखील यंदाच्या प्रदर्शनाचे खास आकर्षण असणार आहेत. तसेच कुंड्यांमध्ये वाढविलेली फळझाडे व फुलझाडे, फळभाज्यांची झाडे, मोसमी फुलझाडे, औषधी वनस्पती, बोनसाय यांचे अक्षरशः शेकडो प्रकार मुंबईकरांना या प्रदर्शनात पहायला मिळणार आहेत. तसेच मुंबई परिसरात अत्यंत दुर्मिळ असणा-या कृष्णवडासारख्या अनेक दुर्मिळ देशी प्रजातींची झाडे देखील यंदाच्या प्रदर्शनात असणार आहेत. पहिल्या दिवशी दुपारी १२ ते सायंकाळी ८ पर्यंत; तर ०४ फेब्रुवारी व ५ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ८ या दरम्यान हे प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुले असणार आहे, असे परदेशी यांनी सांगितले.

अवजारे, बागकाम पुस्तके खरेदी करता येणार-
या प्रदर्शनासोबतच आयोजित होणा-या विक्री दालनांमध्ये विविध प्रकारच्या झाडांची रोपे, बियाणे, खते, बागकामाची अवजारे, बागकाम विषयक पुस्तके यासारख्या अनेक बाबी खरेदी करण्याची संधीही मुंबईकरांना असणार आहे. तसेच मुंबईकर नागरिकांसाठी उद्यानविद्या विषयक विविध कार्यशाळांचे आयोजन देखील करण्यात येणार आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)