ई-फेरफार नोंदीचे काम 31 डिसेंबर पूर्वी पूर्ण करावे - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 November 2016

ई-फेरफार नोंदीचे काम 31 डिसेंबर पूर्वी पूर्ण करावे - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दिनांक 7- राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्हयातील संगणकीकृत 7/12 व ई-फेरफार नोंदीचे काम 31 डिसेंबर 2016 पूर्वी पूर्ण करावे. तसेच राज्यातील सर्व तलाठ्यांना लॅपटॉप व प्रिंटर उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडील जिल्हा वार्षिक योजना व नाविन्यपूर्ण योजनेच्या निधीतून आवश्यक तो निधी तातडीने उपलब्‍ध करुन देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले.
संगणकीकृत 7/12 व ई-फेरफार नोंद तसेच महाराष्ट्र राज्य तलाठी महासंघाच्या मागण्याबाबत आढावा घेण्यासाठी महसूलमंत्री श्री. पाटील यांनी आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांचेशी व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विजय गौतम यांचेसह महसुल विभाग व एन.आय.सी.चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी महसूलमंत्री पाटील म्हणाले की, संगणकीकृत 7/12 व ई-फेरफार नोंदीचे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी तहसीलदार यांनी ज्या काही अडीअडचणी असतील त्याची माहिती करुन घ्यावी व त्याची तपासणी करुन त्या तातडीने सोडविण्यासाठी उपाययोजना कराव्यात. संगणकीकृत 7/12 व ई-फेरफार नोंदीचे काम तातडीने पूर्ण होण्यासाठी मंडळ स्तरावर वर्क स्टेशन स्थापन करुन तेथे आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. सर्व्हर स्पीड, सॉफटवेअरमधील अडचणी, डेटा कार्ड रक्कम अदा करणे, एडीट मॉडयुल चे काम सुटसुटीत करणे आदि विषयांचा विभागनिहाय व जिल्हानिहाय आढावा यावेळी महसूलमंत्री पाटील यांनी घेतला. व तांत्रिक अडचणी तातडीने सोडविण्यात येवून 31 डिसेंबर 2016 पूर्वी संगणकीकृत 7/12 व ई-फेरफार नोंदीचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले. 

त्याचबरोबर ज्या ठिकाणी तलाठ्यांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे तेथे तातडीने प्रशिक्षण देण्यात यावेत. त्याचबरोबर ज्या तलाठ्यांची डेटा कार्डची रक्कम देणे बाकी असेल त्यांची रककम तातडीने त्यांना अदा करावी, एडीट मॉडयुल चे काम सुटसुटीत करण्यासाठी एडिट मॉडयुलमधील आवश्यक सुधारणा विषयतज्ञ समितीकडे सादर कराव्यात असेही पाटील यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर तलाठी सज्जांच्या पुनर्रचनेबाबत शासन सकारात्मक असून त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल असेही महसूलमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

Post Bottom Ad