गच्चीवरील उपहारगृह मालकांकडून नियमांची पायमल्ली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 December 2017

गच्चीवरील उपहारगृह मालकांकडून नियमांची पायमल्ली


मुंबई | प्रतिनिधी - पालिका आयुक्तांनी नुकताच गच्चीवरील उपहारगृहांना हिरवा कंदील दिला. गच्चीवरील उपहारगृहांच्या धोरणात अाग सुरक्षेबाबतच्या नियमांची अट घातली. मात्र, उपहारगृह मालकांकडून त्या नियमांची पायमल्ली केली जात आहे. कमला मिल कंपाऊंडमधील पबमध्येही नियमांचे उल्लघंन केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुंबईतील सर्वच ठिकाणच्या गच्चीवरील उपहारगृहांच्या सुरक्षेचा प्रश्न एेरणीवर आला आहे.
शिवसेना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गच्चीवर उपहारगृहाची संकल्पना मांडली होती. सन २०१४ मध्ये पालिकेने हे धोरण सुधार समितीत मंजुरीसाठी आणले. भाजप, मनसेच्या प्रखर विरोधामुळे मागील तीन वर्षांपासून हा प्रस्ताव मंजूरीविना रखडला होता. दरम्यान, मुंबईत गच्चीवरील अनेक हॉटेल्स बंद पडल्याने हजारो तरूण बेरोजगार झाल्याचा दावा शिवसेनेने केला. यानंतर पालिका सभागृहात हा प्रस्ताव बहुमताने मंजूर झाला. पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी यावर ५ नोव्हेंबर २०१७ रोजी हिरवा कंदील दिला होता. मुंबईतील अनेक हॉटेलवर उपहारगृह बनविण्याची कार्यवाही यानंतर सुरु झाली. मात्र, अनेक उपहारगृह मालकांकडून नियमांचे उल्लघंन करण्याचे प्रकार सुरु आहेत. कमला मिल कंपाउंडमधील वन अबव व मोझो पबला गुरुवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत उपहारगृहांने अग्निशमन दलाच्या नियमांची अंमलबजावणी केली नसल्याचे समोर आले. परिणामी आगीत १४ जणांचा मृत्यू तर ५४ जण जखमी झाले, असे आरोप होत आहेत. मुंबईतील अशा घटना टाळण्यासाठी पालिकेने कठोर नियमावली तयार करावी, नियमांची तपासणी न करता परवाने देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी. तसेच उपहारगृहांबाबत नव्याने धोरण तयार करावे, अशी मागणी केली जात आहे.

Post Bottom Ad