धर्मा पाटील यांचा मृत्यू ही सरकारने केलेली हत्याच - धनंजय मुंडे - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

29 January 2018

धर्मा पाटील यांचा मृत्यू ही सरकारने केलेली हत्याच - धनंजय मुंडे


औरंगाबाद - "धर्मा पाटील यांचा मृत्यू हा मृत्यू नसून ती या सरकारने केलेली हत्या आहे, हे तुमचे पाप आहे' अशा शब्दांत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर हल्लाबोल केला. हे प्रकरण आघाडी सरकारच्या काळातले आहे असे सांगून खोटी माहिती देण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरु आहे. जनतेची फसवणूक करण्याचा केविलवाणा प्रयत्न हे सरकार करत असल्याचा आरोपही मुंडे यांनी केला. औरंगाबाद येथे आज (ता. 29) राष्ट्रवादी भवनात आजोजित पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे बोलत होते.

यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत 3 फेब्रुवारीला होणाऱ्या हल्लाबोल मोर्चाची माहिती मुंडे यांनी दिली. मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या करणाऱ्या शेतकरी धर्मा पाटील मृत्यू प्रकरणावरून मुंडे यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. दोन वर्षापासून पुर्नःमुल्यांकनाची धर्मा पाटील यांची मागणी होती, मग ती का टाळली ? त्यांचा मृत्यू होताच सरकारमधील एक मंत्री पत्रकार परिषद घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना धर्मा पाटील यांच्या जमिनीचे पुर्नमुल्यांकन करण्याचे आदेश दिल्याचे सांगतो. इतके दिवस का थांबलात, त्यांच्या मुत्यूची हे सरकार वाट पाहत होते का ? असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी केला.

दोन वर्षात या सरकारला काहीच करता आले नाही, आता आपले पाप झाकण्यासाठी आघाडी सरकारच्या काळातील हे प्रकरण असल्याचे सांगून दिशाभूल केली जात आहे. या प्रकरणात 2011 पर्यंत हरकती मागवणे, त्यावरील सुनावणी, न्याय निवाडे आणि मोजणी यातच वेळ गेला. 7 एप्रिल 2014 पर्यंत ही प्रक्रिया सुरु होती. प्रत्यक्ष मोबदला देण्याचा विषय 2015 मध्ये म्हणजेच भाजप सरकारच्या काळातच आला. याचे लेखी पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत यावेळी केला.

गिरासे कुणाचे नातेवाईक? -
धर्मा पाटील यांच्या जमिनीला लागून असलेल्या गिरासे यांच्या 78 गुंठे जागेला 1 कोटी 89 लाखांचा मावेजा देण्यात आला. विहिर, बोअर नसताना केवळ सहाशे आंब्याची झाडे आहेत म्हणून गिरासे यांना हा भाव देण्यात आला. तर त्यांच्या जमीनीला लागूनच असलेल्या धर्मा पाटील यांच्या पाच एकर शेतात विहिर, बोअर आणि पाचशे आंब्याची झाडे असून देखील त्यांना केवळ चार लाखांचा मोबदला मिळाला. लागून असलेल्या दोन जमिनीच्या मोबदल्यामध्ये एवढी प्रचंड तफावत कशी? गिरासे कुणाचे नातेवाईक आहेत याचा शोध घेण्याची गरज असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

धर्मा पाटील यांनी वारंवार पुर्नमुल्यांकनाची मागणी केली होती, पण त्यांच्या एकट्याच्या जमीनीचे पुर्नमुल्यांकन करता येणार नाही, गिरासे यांच्या जमीनीचेही पुर्नमुल्यांकन करावे लागेल आणि तसे झाले तर आपले पितळ उघडे पडेल या भीतीपोटीच सरकारने दोन वर्ष टाळाटाळ केली. त्यामुळे धर्मा पाटील यांचा जीव गेला असा आरोप धनंजय मुंडे यांनी योवळी केला.

तत्पूर्वी त्यांनी सकाळी औरंगाबादच्या राष्ट्रवादी भवनात हल्लाबोल यात्रेच्या तयारीसाठी शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक घेतली या बैठकीस माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, महिला अध्यक्षा चित्राताई वाघ, आमदार सतीश चव्हाण, आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, आमदार विक्रम काळे व पदाधिकारी उपस्थित होते.

Post Top Ad

test
test