सर्वोच्च न्यायालयाच्या कारभारावर न्यायाधीशांनी डागली तोफ - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

12 January 2018

सर्वोच्च न्यायालयाच्या कारभारावर न्यायाधीशांनी डागली तोफ

नवी दिल्ली - देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायाधीशांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या कारभारावरच तोफ डागल्याने लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ असलेल्या न्यायपालिकेतच भूकंप झाला आहे. `गेल्या दोन महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयाचा कारभार व्यवस्थित चालत नाही. पूर्वी कधी असे घडले नाही. हे असेच सुरू राहिले आणि न्यायव्यवस्था टिकली नाही तर लोकशाहीही टिकणार नाही’, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधीश जस्ती चेलमेश्वर यांनी येथील पत्रकार परिषदेत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. सरन्यायाधीशांकडे तक्रार नोंदवूनही काहीच उपयोग झाला नसल्याची खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखविली. 

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जस्ती चेलमेश्वर, न्या. रंजन गोगोई, न्या. मदन लोकूर आणि न्या. कुरियन जोसेफ या चार न्यायाधीशांनी अचानक पत्रकार परिषद बोलावून सर्वोच्च न्यायालयाच्या कारभारावर चिंता व्यक्त करत सरन्यायाधीशांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काही महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयाचे काम अव्यवस्थितपणे सुरू आहे. त्यामुळे आम्ही व्यथित झालो आहोत. याबाबतची लेखी तक्रार मुख्य न्यायाधीशांकडे केली आहे. पण काहीच उपयोग झालेला नसल्याने आम्हाला आता प्रसार माध्यमांसमोर यावे लागले आहे. आता जनतेनेच योग्य काय ते ठरवावे, असे सांगतानाच मुख्य न्यायाधीशांना दिलेले तक्रारीचे पत्र सार्वजनिक करणार असल्याचे चेलमेश्वर यांनी सांगितले.

`न्यायव्यवस्थेत भ्रष्टाचार वाढला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाविरोधात आम्ही सरन्यायाधीशांना चार महिन्यांपूर्वीच पत्र लिहिले होते. त्यात एका खटल्याच्या असाइन्मेंटबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनी आमचे ऐकले नाही. देशासमोर आम्ही या गोष्टी ठेवल्या नाहीत तर लोकशाही संपुष्टात येईल. आम्ही विकले गेलोय असा आरोप भविष्यात आमच्यावर कोणी करू नये, यासाठीच या पत्रकार परिषदेचे प्रयोजन करण्यात आले आहे’, असेही त्यांनी सांगितले.

देशभरात खळबळ -
न्या. चेलमेश्वर हे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यानंतरचे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहे. त्यांनीच पत्रकार परिषद घेऊन आरोप केल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या कामकाजात अनियमितता म्हणजे नेमके काय?, तुमची मागणी काय होती?, असे प्रश्न त्यांना विचारण्यात आले. मात्र त्यांनी याबाबत भाष्य करण्यास नकार दिला. तसेच न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूप्रकरणाशी याचा काही संबंध आहे का? असा प्रश्न विचारला असता न्या. लोकूर यांनी त्यावर `हो’ असे उत्तर दिले. मात्र, त्यांनी देखील याबाबत सविस्तर भाष्य केलेले नाही.

कनिष्ठ न्यायाधीशांकडे महत्त्वाचे खटले दिल्याने नाराजी -
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन महिन्यांपूर्वी या चार न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहीले होते. या चौघांपेक्षा कनिष्ठ असलेल्या न्यायाधीशांकडे महत्त्वाचे खटले दिले जात होते, याबाबत चौघांनीही नाराजी व्यक्त केली होती, असे सांगितले जाते. सर्व मुख्य खटल्यांची सुनावणी सरन्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर होते. याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

सरन्यायाधीशांची पत्रकार परिषद रद्द -
या पत्रकार परिषदेनंतर सरन्यायाधीश दीपक मिश्रा हे पत्रकार परिषद घेणार होते. परंतु ऐनवेळी त्यांनी आपली प्रस्तावित पत्रकार परिषद रद्द केली. चार न्यायमूतvनी सुप्रीम कोर्टाचे कामकाज नीट चालत नसल्याचा गौप्यस्फोट केल्यानंतर, खुद्द सरन्यायाधीशही आपली बाजू मांडणार होते. त्यासाठी सरन्यायाधीश मिश्रा हे देशाच्या महाधिवक्त्यांसोबत पत्रकार परिषद घेणार होते. मात्र काही कारणास्तव त्यांनी ही पत्रकार परिषदच रद्द केली.

Post Top Ad

test
test