दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 April 2018

दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा


दादर झाड दुर्घटनेचे पालिका सभागृहात पडसाद -
मुंबई - दादर मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय येथे झाड पडून दिनेश सांगळे या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेचे पालिका सभागृहात चांगलेच पडसाद उमटले. विरोधी पक्ष नेते रवी राजा यांच्यासह सर्व पक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरत दोषी अधिकाऱ्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी दादर येथील झाड दुर्घटनेचा मुद्दा उपस्थित पालिका सभागृहात उपस्थित केला. गेल्या वर्षभरात झाड अंगावर पडल्याने कांचन नाथ, शारदा घोडेस्वार, तसेच दिनेश सांगळे यांचा मृत्यू झालं आहे. या सर्व दुर्घटनांना पालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत असून या घटनेला जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी रवी राजा यांनी केली. सांगळे यांच्या कुटुंबियापैकी एकाला पालिका सेवेत नोकरीत सामावून घ्यावे तसेच पाच लाखांची आर्थिक मदत करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. अनंत नर यांनी, झाड अशा दुर्घटनेत कोणीही व्यक्ती मृत पावल्यास यासाठी जबाबदार पालिका अधिकाऱयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी झाडे पडून नागरिकांचा मृत्यू होण्याच्या दुर्घटनांना पालिका प्रशासनाचा हलगर्जीपणाच कारणीभूत असल्याचा आरोप केला. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात ते धोकादायक झाड कापण्यासाठी पत्राद्वारे परवानगी मागूनही आठ महिने परवानगी न देणारे अधिकारी या घटनेला जबाबदार आहेत, असे त्या म्हणाल्या. याप्रकरणी पालिकेचा निषेध व्यक्त करण्यासाठी ही सभा तहकुब करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. मुंबईत पावसाळ्यापूर्वी जुन्या धोकादायक इमारतींचे ज्याप्रमाणे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाते त्याप्रमाणे धोकादायक जुन्या झाडांचेही ऑडिट करावे, अशी मागणी सईदा खान यांनी केली. समृद्धी काते यांनी नगरसेवक निधीतून धोकादायक झाड, फांद्या कापण्याची परवानगी देण्याची मागणी केली. स्वप्ना म्हात्रे यांनी झाडे लावा सांगणाऱ्या पालिकेने नागरिकांना जी झाडे, फांद्या धोकादायक वाटतात ती मोफत कापून देण्याची मागणी केली. सर्व पक्षीय नगरसेवकांच्या तीव्र भावना लक्षात घेता महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी कोणतेही कामकाज न करता सभा तहकुब केली.

Post Bottom Ad