मुंबई तुंबणार असल्याने मुंबईकरांमध्ये भीती

JPN NEWS
मुंबई - मुंबईतील नाले सफाईची डेडलाईन संपली तरीही अनेक ठिकाणी नालेसफाईची कामे सुरू आहेत. पालिका प्रशासनाने नाले सफाई पूर्ण झाल्याचा दावा केला असला तरी अजूनही नाले गाळातच असल्याची स्थिती आहे. त्यामुळे यंदाही पाणी तुंबण्याची शक्यता आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही नाले सफाई समाधानकारक झाली नसल्याने यावेळीही मुंबई तुंबणार असल्याची भीती मुंबईकरांमध्ये आहे. 

पावसापूर्वी मुंबईतील नालेसफाईच्या कामाला सुरुवात केली जाते. 31 मे पर्यंत नालेसफाईची अंतीम मुदत होती. मात्र या मुदतीत 100 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. मीठी नदीतला गाळही काढल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. मात्र मानखुर्दमधील लल्लूभाई नाला, अंधेरी पश्चिम येथील मोगरा नाला, मीठी नदी भागातील एअरपोर्ट नाला, अँटोपहिल येथील नाला, वडाळा - कोरबा मीठानगर नाला, चमडावाला नाला हे मोठे नाले अद्याप गाळात असल्याची स्थिती आहे. त्यामुळे वरवरची नाले सफाई करुन दिखावा करण्यात आल्याने येथील रहिवाशांमध्ये संतापाच्या प्रतिक्रिया आहेत. काही वसाहती, रस्त्यांच्या बाजूच्या गटारांतील काढलेला गाळ अद्याप बाजूलाच पडून असल्याने पावसांत हा गाळ पुन्हा नाल्यात जाण्याची शक्यता आहे. मागील वर्षीच्या 29 जुलैला पडलेल्या मुसळधार पावसांत मुंबई तुंबल्याने अनेकांचे संसार उद् ध्वस्त झाले. या पावसांत उघड्या मॅनहोलमध्ये पडून प्रसिध्द पोटविकार तज्ञ डॉ. दिपक अमरापूरकर यांचा बळी गेला. असे असतानाही यंदा प्रशासनाने धडा घेतलेला नाही. पाऊस कधीही कोसळण्याची शक्यता असतानाही मुंबईतले मोठे नाले गाळातच आहेत. केवळ वरवरची नालेसफाई करून 100 टक्के नाले सफाई झाल्याचा प्रशासनाचा दावा खोटा असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे. त्यामुळे तुंबणा-या मुंबईला चाकरमान्यांना यंदाही सामोरे जावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !