श्वानांच्या मालकांना पालिकेचा दणका - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 June 2018

श्वानांच्या मालकांना पालिकेचा दणका


मुंबई - रस्ते व सार्वजनिक ठिकाणी घाण करणा-या श्वानांच्या मालकांना पालिकने दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पालिकेने दंड आकारणारे 32 व्यक्तींचे विशेष पथक नियुक्त केले आहे. या पथकाने मागील तीन दिवसांत 16 श्वान मालकांना प्रत्येकी 500 रुपयाचा दंड आकारला असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी दिली.

सार्वजनिक ठिकाणे, रस्ते वा पदपथांवर अनेक श्वान मालक किंवा संबंधित 'केअर टेकर' हे आपल्या घरातील पाळीव प्राण्याला घेऊन फिरायला येत असतात. अशावेळी अनेकदा रस्त्यावर, पदपथावर वा सार्वजनिक ठिकाणी हे प्राणी विष्ठा उत्सर्जन करतात. यामुळे सार्वजनिक ठिकाणे अस्वच्छ होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. हे लक्षात घेऊन महापालिकेच्या 'डी' विभागाने याबाबत विशेष जनजागृती मोहिम सुरु केली आहे. या मोहिमे अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी आपल्या पाळीव प्राण्याला घेऊन फिरायला येणा-या व्यक्तींचे प्रबोधन केले जात आहे. तसेच कुत्र्याने घाण केलेली असल्यास 'बृहन्मुंबई स्वच्छता आणि आरोग्य उपविधी - 2006' नुसार प्रत्येकवेळी 500 रुपये एवढा दंड देखील करण्यात येत आहे. यानुसार गेल्या 3 दिवसांत 16 व्यक्तींकडून प्रत्येकी 500 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, असे मोटे यांनी सांगितले.

महापालिकेच्या 'डी' विभागामध्ये ऑगस्ट क्रांती मैदान, गिरगाव चौपाटी, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, ग्रॅण्ट रोड, चर्नी रोड, ताडदेव, गोपाळराव देखमुख मार्ग (पेडर रोड), लक्ष्मीबाई जगमोहनदास मार्ग (नेपियन्सी रोड) इत्यादी महत्वाच्या ठिकाणांचा व परिसरांचा समावेश होतो. या परिसरात पाळीव प्राण्यांची संख्या देखील मोठी आहे. तसेच पाळीव प्राण्यांसह सार्वजनिक ठिकाणी फिरायला येणा-यांची संख्याही मोठी आहे. पाळीव प्राण्यांद्वारे सार्वजनिक ठिकाणी घाण होत असल्याच्या काही तक्रारी महापालिकेच्या विभाग कार्यालयाद्वारे प्राप्त झाल्या होत्या. या अनुषंगाने याबाबत विशेष जनजागृती मोहीम विभाग कार्यालयाद्वारे सुरु करण्यात आली आहे.

कारवाईसाठी 32 व्यक्तींचे पथक -
या मोहिमेसाठी 32 व्यक्तींचे पथक कार्यरत आहे. या व्यक्ती 'डी' विभागातील विविध ठिकाणी फिरुन व पाहणी करुन पाळीव प्राण्यांच्या मालकांशी संवाद साधत आहेत. यामध्ये प्रामुख्याने पाळीव प्राण्यांनी रस्त्यावर विष्ठा उत्सर्जित केल्यास अशी विष्ठा उचलण्यासाठी 'शिट लिफ्टर' हे उपकरण वापरुन विष्ठा कशी उचलावी व ती परिसरातील कच-याच्या डब्यात कशी टाकावी? याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले जात आहे.

Post Bottom Ad