पावसाळी अधिवेशनाचे कामकाज फक्त १३ दिवस

JPN NEWS

मुंबई - राज्य विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत अधिवेशनाचा कालावधी आणि कार्यक्रम निश्चित करण्यात आला. ४ जुलैपासून नागपूरला सुरू होणारे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २० जुलैपर्यंत चालणार असून, यात फक्त १३ दिवस कामकाज चालणार आहे.

सल्लागार समितीच्या बैठकीत शासकीय कामकाजाच्या नियोजनावरही चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमानुसार हे अधिवेशन ४ ते २० जुलै या अधिवेशनाचा कालावधी असेल. एकूण १७ दिवसांच्या कामकाजात ४ सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार शनिवार ७ जुलै, रविवार ८ जुलै, शनिवार १४ जुलै आणि रविवार १५ जुलै या दिवशी अधिवेशनाला सुट्टी असल्याने प्रत्यक्षात केवळ १३ दिवस कामकाज होईल. पहिल्या दिवशी कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे शोक प्रस्ताव मांडण्यात येईल. या अधिवेशनात नवीन ९ आणि प्रलंबित १० अशी एकूण १९ विधेयके मांडली जातील. विधान परिषदेतील ११ सदस्यांचा कार्यकाल या काळात संपत असल्याने विधान परिषदेत कामकाजाच्या शेवटच्या दिवशी त्यांना निरोप दिला जाणार आहे. विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट, शिक्षण मंत्री विनोद तावडे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, आ. अजित पवार, जयंत पाटील, गणपतराव देशमुख उपस्थित होते. विधान परिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती माणिकराव ठाकरे, मुख्यमंत्री, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, संसदीय कार्यमंत्री, सुनील तटकरे, भाई गिरकर, जयंत पाटील आदी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !