अंधेरीतील पूल दुर्घटनाप्रकरणी रेल्वे प्रशासनामार्फत उच्चस्तरीय चौकशी सुरु - मुख्यमंत्री

JPN NEWS
नागपूर - अंधेरीत पूर्व पश्चिमेला जोडणारा गोखले पादचारी पूल कोसळल्याप्रकरणी रेल्वे प्रशासनामार्फत उच्चस्तरीय चौकशी सुरु असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.

सदस्य योगेश सागर यांनी अंधेरीतील गोखले पादचारी उड्डाणपूल कोसळल्याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती त्याला उत्तर देताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले मुंबईतील रेल्वे रुळावरील पुलांचे सेफ्टी ऑडिट करण्याचे रेल्वे प्रशासनाला आदेश देण्यात आले आहेत. रेल्वे विभागाला पुलांच्या देखभाल दुरुस्तीसाठी 2017-18 मध्ये मध्य रेल्वेला 11 कोटी आणि पश्चिम रेल्वेला चार कोटी, 2018-19 मध्ये मध्य रेल्वेला साडेतीन कोटी आणि पश्चिम रेल्वेला 24 लाख रुपये देण्यात आले आहेत.

फडणवीस म्हणाले, हा पादचारी पूल महानगरपालिकेचा होता मात्र त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची होती. या पुलाची दुरुस्ती करण्यात आली होती. परंतु ज्या प्रकारे या पुलाचे ऑडिट व्हायला पाहिजे होते त्याप्रमाणे झाले नव्हते. त्यामुळे या दुर्घटनेसंदर्भात रेल्वे विभागाने उच्चस्तरीय चौकशी सुरु केलेली आहे. आणि त्यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. तसेच पुलांचे ऑडिट आणि उपाय योजना करण्यासाठी आयआयटीच्या सहाय्याने पथके निर्माण करण्यात आली असून पुढच्या पावसाळ्यात या पथकांचे अहवाल येतील त्यानुसार सुधारणा केल्या जातील व त्यासाठी कालमर्यादा ठरविली जाईल. नवीन कामांमध्ये युटिलिटी कॉरिडॉर तयार करण्याच्या महानगरपालिकेला सूचना देण्यात येतील. हॅकाँक पुलाबाबत बोलताना या पुलाच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया झाली असून लवकरच काम सुरु करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी सदस्य अमित साटम, वारीस पठाण, मनीषा चौधरी, भारती लव्हेकर यांनी सहभाग घेतला.