नागपूर - मुंबईत पावसाळ्यात झाड किंवा फांदी पडून व्यक्ती मृत्यू व जखमी होण्याचे प्रमाण वाढत आहे. या घटनेत मृत्यू किंवा जखमी झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना शासकीय मदत करण्याविषयी मुंबई महानगरपालिकेला निर्देश देण्यात येतील, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.
नियम 93 अन्वये सदस्य किरण पावसकर यांनी सूचना मांडली होती, त्याला उत्तर देताना डॉ.पाटील बोलत होते. ते म्हणाले, मुंबई महापालिका हद्दीमध्ये काही ठिकाणी झाड व झाडाची फांदी पडून एप्रिल ते जून 2018 या कालावधीत सहा जणांचा मृत्यू झाला. 1 जून 2018 पासून आतापर्यंत महापालिका क्षेत्रात झाडे पडल्याच्या 46 घटना व खासगी क्षेत्रात 153 घटना घडल्या आहेत. पडलेली झाडे महापालिकेने तात्काळ हटविली आहेत. पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडे व फांद्यांची कापणी करण्यात आली आहे. जिथे अपघात घडत आहेत तिथल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. सदस्य ॲड. राहुल नार्वेकर यांनी या चर्चेत भाग घेतला.