बेपत्ता अल्पवयीन मुली, महिलांच्या शोधासाठी सायबर सेलची मदत - गृह राज्यमंत्री

JPN NEWS

नागपूर - बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलींना शोधण्यासाठी सायबर सेलची मदत घेणार असल्याचे गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्या हुस्नबानू खलिफे यांनी मुंबईत अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढल्याबाबतचा प्रश्न विचारला होता. याला उत्तर देताना डॉ. पाटील म्हणाले, 2013 ते 2017 या कालावधीत 18 वर्षाखालील 5 हजार 56 मुली हरवलेल्या होत्या त्यापैकी 4 हजार 758 मुली सापडल्या आहेत. याच कालावधीतील 18 वर्षावरील 21 हजार 652 महिला हरवल्या होत्या. त्यापैकी 19 हजार 686 महिला सापडल्या आहेत. हरवलेल्या व्यक्तींचा तपास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने प्रमाणित कार्यपद्धती आखून दिलेली आहे, त्याप्रमाणे हरवलेल्या किंवा अपहरण झालेल्या मुले, मुली, महिला यांच्याबाबत गुन्हा दाखल करण्यात येतो. हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी तीन वेबसाईट्स कार्यान्व‍ित केल्या आहेत. तसेच ऑपरेशन मुस्कान व ऑपरेशन स्माईलच्या एकूण सहा शोध मोहिमा राबविण्यात आल्या आहेत. ज्या मुली, महिलांसदर्भात तक्रारी नव्हत्या अशा शेकडो मुली, मुले आणि महिला या मोहिमेंतर्गत सापडल्या आहेत. पोलीस यंत्रणा याबाबतीत सक्षमपणे काम करीत असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य भाई जगताप, संजय दत्त, डॉ.नीलम गोऱ्हे, विद्या चव्हाण यांनी भाग घेतला.