मुंबई - १५ वर्षीय मुलीचा विवाह लावणाऱ्या काकासह नवरेदवाला गुन्हे प्रकटीकरण शाखा युनिट ९ च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. या दोघांना न्यायालयात हजर केले असता, २९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पिडीत मुलीची रवानगी डोंगरी येथील बालसुधारगृहात करण्यात आल्याची माहिती पोलिसानी दिली.

वांद्रे पश्चिम माऊंट मेरी हिल येथे एक मुलगी रडत असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या युनिट ९ च्या महिला पोलीस निरीक्षक आशा कोरके यांना मिळाली. ही माहिती वरिष्ठांना सांगून कोरके या तत्काळ माऊंट मेरी हिल येथे आल्या. त्यांनी मुलीकडे चौकशी केली, मात्र तिला बंगाली भाषेशिवाय दुसरी भाषा समजत नसल्याचे कळले. पोनि. कोरके यांनी बंगाली भाषा येणाऱ्या एका इसमाला मध्यस्ती घेऊन मुलीशी संवाद साधला असता, बालविवाह व लैंगिक शोषणाचे प्रकरण उजेडात आले. तोमेर नौशाद अली शेख (४०) याने जुलै २०१८ महिन्यात १५ वर्षीय मुलीचा साजिद मुस्तफा (१९) या तरुणासोबत विवाह लावून दिला. पुतणी अल्पवयीन असल्याचे माहीत असताना तोमेर नौशाद अली शेख याने विवाह लावून दिला.

पश्चिम बंगाल येथील जि. मालदा, ता. संबलपूर, मुक्काम कुतुबगंज येथे विवाह झाल्यानंतर काही दिवसांनी साजिन मुलीला घेऊन वांद्रे पूर्व परिसरातील बेहरामनगर येथे आला. तेथे साजिदने मुलीच्या मनाविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दारूच्या नशेत साजिद मुलीशी रोज बळजबरी करायचा. आजूबाजूला माहीत पडू नये म्हणून साजिद मुलीला घरात कोंडून ठेवायचा. रोजच्या अत्याचाराला वैतागून मुलीने २१ ऑगस्ट रोजी घरातून पळ काढला, अशी माहिती बंगाली भाषा जाणणाऱ्या इसमाने पोनि. कोरके यांना दिली. पोलीस पथकाने तपासाची चक्रे फिरवून मुलीचा काका तोमेर नौशाद अली शेख व साजिद शेख यांच्या मुसक्या आवळल्या. त्या दोघांना निर्मल नगर पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तोमेर नौशाद अली शेख व साजिद शेख यांना अटक केली. 
Previous Post Next Post