Type Here to Get Search Results !

लठ्ठ मुलांची हाडे कमकुमवत असतात का ?


मुलांमधील लठ्ठपणा हा आजच्या काळातील साथीचा आजार आहे. १९९० च्या तुलनेत आज लठ्ठ मुलांचे प्रमाण तिप्पट झाले आहे. काल ज्यांचे गोबऱ्या गालांचे म्हणून लाड केले जात होते ते आज लठ्ठ झाले आहेत आणि शाळा व सोशल मीडियामध्ये लठ्ठपणाबद्दल चेष्टा करणे सर्रास आढळून येत आहे. लठ्ठपणामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, मधुमेह, ऑस्टिओआर्थरायटिस, उच्च रक्तदाब, ऑस्टिओपोरोसिस आणि नैराश्य येण्याचे वय कमी कमी होत जात आहे, असे चित्र एक डॉक्टर म्हणून दिसून येत आहे. अशा लठ्ठ मुलांना काही प्रकारचे कर्करोग, यकृत आणि पित्ताशयाच्या समस्या, स्लीप अॅप्निया आणि पौगंडावस्थेत सीओपीडी असे आजार जडू लागले आहेत.

जीवनशैली आणि आहार शैली हे यासाठी कारणीभूत असलेले मुख्य घटक आहेत. अधिक आहार आणि व्यायामाचा अभाव वजन वाढण्यास कारणीभूत आहे. स्मार्ट फोन व सोशल मीडिया, इंटरनेट, टेलिव्हिजन आणि व्हिडियो गेममुळे मैदानावर खेळण्याचा वेळ कमी होतो. सध्याच्या स्पर्धेच्या जगात मुलांना वाढत्या वयात शाळेतील बाके, शिकवणी आणि गृहपाठासाठी बसून राहणे अपरिहार्य ठरते.

नियमित शारीरिक हालचालीच्या अभावामुळे स्नायू आणि हाडे कमकुवत होतात, त्याचप्रमाणे वजनही खूप वाढते. एक शीत पेय, तळलेले पदार्थ, डबल चीज बर्गर आणि गोड पदार्थ या ४२ किलोमीटरच्या मॅरेथॉनला पुरतील, एवढ्या कॅलरी असतात. त्याचप्रमाणे जेवणासोबत १ शीत पेय प्यायले तर केवळ १० वर्षात ५० किलो वजन वाढू शकते. जंक फूड आणि शीत पेये यातून जीवनसत्व, कॅल्शिअम आणि प्रथिने मिळत नाहीत. कारण अन्नातील हे घटक शोषून घेण्यास हे पदार्थ अडथळा निर्माण करतात.

त्याचप्रमाणे चयापचय क्रियेशी आणि संप्रेरकांशी संबंधित विकारही होण्याची शक्यता असते. पूर्वी क्वचित आढळणारे आजार म्हणजेच जन्मत: होणारी लेप्टिनची कमतरता, थायरॉइडचा विकार, ग्रोथ हार्मोन डेफिशिअन्सी, हायपरइन्सुलिनेमिया आणि कमी वयात होणारा मधुमेह या आजारांचे प्रमाण अलीकडे खूप वाढले आहे. स्नायूंच्या आणि सांध्यांच्या तक्रारींसाठी लठ्ठ मुलांना सामान्य मुलांच्या तुलनेत दुप्पट वेळा स्पेशालिस्टकडे जावे लागते. शस्त्रक्रिया करायची झाल्यास, या मुलांमध्ये गुंतागुंत होण्याचे प्रमाण अधिक असते.

या समस्येबद्दल समज वाढविण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशन गाइडलाइन्सनुसार (२०१५) ४-१८ वयोगटातील मुलांमध्ये आहारातून जाणाऱ्या चरबीचे प्रमाण केवळ ३०% असावे. अशी चरबी एमयूएफए आणि पीयूएफए, उदा. मासे, चणे आणि भाज्यांमधील तेलांमधून मिळते. सुलभपणे उबलब्ध होणाऱ्या पदार्थांमध्ये प्रचंड कॅलरी असतात. त्यात सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅटचे प्रमाणही खूप असते. त्याचप्रमाणे फायबर (तंतू) आणि मायक्रोन्यूट्रिअंट्सचे (सूक्ष्म पोषक द्रव्ये) प्रमाण कमी असते. उदा. बिस्किटे, वेफर आणि वडा पाव. अशा प्रकारचे सुलभ पदार्थ आठवड्याभरात वजन वाढू लागते. रेस्टॉरंटमधील पदार्थ आणि फास्ट फूडमध्ये घरी तयार केलेल्या पदार्थांच्या तुलनेत खूप कॅलरी असतात. त्यामुळे बाहेरील पदार्थ खाण्याऐवजी घरचा डबा नेणे कधीही हितावह असते.

पालक, काळजीवाहक, मित्र आणि शिक्षक यांनी एकत्रितपणे मदत आणि प्रोत्साहनपर वातावरणनिर्मिती करण्याची आवश्यकता असते. सायकलिंग आणि पोहाणीसारख्या खेळांसाठी दिवसातील काही वेळ निश्चितच दिला गेला पाहिजे. बालरोगतज्ज्ञ, आहारतज्ज्ञ, अस्थिविकारतज्ज्ञ यांचा सल्ला आवश्यकतेनुसार घेण्यात यावा. बाळाच्या सुरुवातीच्या काळात फिटनेस आणि आरोग्याच्या सवयी लावल्या तर त्या बाळाला आयुष्यभर त्याचा लाभ होईल.

काही संशोधन अहवालांमध्ये लठ्ठपणामध्ये वाढलेल्या चरबीविषयी चर्चा करण्यात आली आहे. ही चरबी स्नायूंमध्ये साचते. स्नायूंमध्ये साचलेल्या चरबीमुळे हाडांच्या वाढीवर परिणाम होतो. जेव्हा ती व्यक्ती व्यायाम करू लागते तेव्हा त्या व्यक्तीची चरबीचा थर स्नायूंमध्ये परिवर्तीत होतो. वाढत्या वयामध्ये मुलांमध्ये चरबीचे प्रमाण अधिक असते आणि शारीरिक हालचालीच्या अभावी ही चरबी स्नायूंमध्ये साचू लागते.

या समस्येला हाताळण्याचे विविध मार्ग आहेत. यातील पहिला मार्ग म्हणजे मुलांना संतुलित आहार घेण्याची सवय लावणे आणि सुलभ प्रक्रिया केलेले पदार्थ टाळणे. मुलांमध्ये स्नायू हे हाडांची वाढ कशी होणार याचे निर्धारक असतात.

तुम्ही तुमच्या मुलांच्या हाडांचे आरोग्य कसे सांभाळू शकता - 
- कॅल्शिअम व जीवनसत्वयुक्त आहाराला प्रोत्साहन द्या. चपात्या करताना त्यात सोयाबीनचे पीठ मिसळा
- घरी केलेल्या भाज्यांमध्ये पनीरचे तुकडे घाला
- कम्प्युटर गेमच्या ऐवजी मैदानी खेळांना प्रोत्साहन द्या. तुमच्या मुलांना मॉलऐवजी बागेत घेऊन जा, चित्रपटांऐवजी छोट्या ट्रेकवर घेऊन जा आणि रेस्टॉरंटऐवजी घरच्या घरी चविष्ट पदार्थ खायला द्या.

हाडांच्या रिसायकलिंग प्रक्रियेचा भाग म्हणजे पृथ:करण करणे आणि कॅल्शिअम व इतर क्षार
रक्तप्रवाहात सोडणे. हे क्षार मूत्रपिंडाद्वारे गाळले जातात आणि मूत्रावाटे बाहेर टाकले जातात. हाडांचे
संरक्षण करण्यासाठी ही झीज कमीत कमी करणे याकडे लक्ष देण्यात यावे.
- डॉ. मनन गुजराथी, 
अस्थिविकार शल्यविशारद, एसआरव्ही ममता हॉस्पिटल
Tags

Top Post Ad

Below Post Ad