Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

बंद काळात अनुचित प्रकार घडू नये याकरिता दक्षता घ्या - मुख्य सचिव

मुंबई - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 9 ऑगस्ट रोजी पुकारण्यात आलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी आज पोलिस, वाहतूक, रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. सुरक्षेचा आढावा घेताना, बंद काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता यंत्रणांनी अधिक दक्षता घ्यावी, असे मुख्य सचिवांनी यावेळी सांगितले.

मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात सायंकाळी यासंदर्भात आढावा बैठक झाली. बंद काळात संपूर्ण राज्यभरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्याबरोबरच शहरांमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत राहील यासाठी प्रयत्न करावे. एसटी बस सेवा त्याचबरोबर मुंबईत बेस्टची बस सेवा सुरळीत सुरु राहण्यासाठी पोलिसांनी आवश्यक ते सहकार्य करावे, असेही मुख्य सचिवांनी सांगितले. शाळा-महाविद्यालयांना आवश्यक ती सुरक्षा देतानाच या काळात असलेल्या परीक्षा व्यवस्थितपणे पार पडतील याची काळजी घ्यावी. बंद काळात रेल्वेसेवा सुरु राहील याची दक्षता रेल्वे सुरक्षा दलाने घ्यावी. सर्वच यंत्रणांनी परस्परांशी समन्वय ठेवून बंद काळात आवश्यक त्या सेवांवर परिणाम होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असेही मुख्य सचिवांनी यावेळी सांगितले.

बैठकीस गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर, परिवहन विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, मुंबई पोलिस आयुक्त सुबोध कुमार जैसवाल यांच्यासह मुंबई महापालिका, बेस्ट, राज्य महामंडळ, रेल्वे, रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Bottom