Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

महाराष्ट्रात ११ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरु होणार

नवी दिल्ली - ‘पासपोर्ट आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या चौथ्या टप्प्यांतर्गत महाराष्ट्रात ११ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्यात येणार असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रास दिली. या नवीन केंद्रांसह राज्यात पासपोर्ट सेवा केंद्रांची एकूण संख्या ३६ होणार आहे.

नागरिकांना त्यांच्या जिल्ह्यातच पासपोर्ट मिळावा यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ‘पासपोर्ट आपल्या दारी’ या कार्यक्रमांतर्गत पोस्ट विभागाच्या मदतीने जानेवारी २०१७ मध्ये देशभरात २८९ पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्याचा कार्यक्रम हाती घेतला. टप्प्याटप्प्याने या कार्यक्रमाची अंमलबजावणी होत असून देशभरात आतापर्यंत २१८ पासपोर्ट सेवा केंद्र सुरु झाली आहेत. या कार्यक्रमाच्या चौथ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे. यानुसार देशभरात ८७ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्यात येणार आहेत. यापैकी महाराष्ट्रात ११ नवे केंद्र उभारण्यात येणार असल्याचे डॉ. मुळे यांनी सांगितले.

पहिल्या तीन टप्प्यात महाराष्ट्रात २५ पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. यापैकी आतापर्यंत १४ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरु झाली आहेत. तर ४ सप्टेंबर २०१८ रोजी बारामती येथे नवीन केंद्राची सुरुवात होणार असल्याचे डॉ. मुळे यांनी सांगितले. पहिल्या तीन टप्प्यातील २५ आणि चौथ्या टप्प्यातील ११ असे एकूण ३६ पासपोर्ट सेवा केंद्र राज्यात उभारली जाणार आहेत असेही ते म्हणाले.

११ नवीन पास पोर्ट सेवा केंद्र - 
राज्यात भंडारा, गडचिरोली, रामटेक, बुलडाणा, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी,धुळे, रावेर, रायगड आणि भिवंडी याठिकाणी नवीन पासपोर्ट सेवा क्रेंद्र उभारण्यात येणार आहेत. गेल्या दीड वर्षात १४ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्यात आली. यामध्ये वर्धा,जालना, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, नांदेड, सांगली, कोल्हापूर, सातारा,घाटकोपर-विक्रोळी, पिंपरी-चिंचवड, पंढरपूर, नांदेड, सिंधुदुर्ग या शहरांचा समावेश आहे. या नवीन केंद्रांद्वारे पासपोर्ट वितरणाचे कार्यही सुरु झाले आहे. बारामती येथे ४ सप्टेंबर रोजी पासपोर्ट सेवा केंद्र सुरु होणार असून यानंतर अकोला,अमरावती, चंद्रपूर, डोंबिवली, लातूर, माढा, मुंबई नॉर्थ सेंट्रल, मुंबई साऊथ सेंट्रल, नवी मुंबई, पनवेल याठिकाणी पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्याच्या दिशेने कामास सुरुवात होणार आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom