
मुंबई - मुंबईच्या राणीबागेत १५ ऑगस्टला रात्री आठच्या सुमारास मोल्ट आणि फ्लिपर या पेंग्विनचे पिल्लू अंडे फोडून बाहेर आले. भारतात पेंग्विनच्या पिल्लाने पहिल्यांदाच जन्म घेतला. भारतात पहिला पेंग्वीन जन्माला आल्याने कौतुक झाले, पण जन्माला आलेला पेंग्विनचा आठ दिवसातच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
राणीबागेतील डॉ. मधुमिता काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सात पेंग्विन आणि पिल्लाची काळजी घेतली जात होती. नर मोल्ट आणि मादी पेंग्विन पिल्लाची काळजी घेत होते. त्याला वेळच्या वेळी नर मादीकडून ऍन भारावले जात होते. त्याची वाढ योग्य प्रकारे होत होती, जन्मावेळी ७५ ग्राम वजन असलेल्या पिल्लाचे वजन २१ ऑगस्टला ९७ ग्राम झाले होते. मात्र २२ ऑगस्टला अचानक त्याचे वजन ८१ ग्राम झाले. त्याला डॉक्टरांनी दोन वेळा भरवले. सायंकाळी ६.३० नंतर त्याची हालचाल बंद झाली. रात्री ९.३० वाजता त्याचा मृत्यू झाल्याचे समजले. मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी आणि पक्षीतज्ञ प्राध्यापकांनी २३ ऑगस्टला सकाळी साडेनऊ वाजता पिल्लाचे शवविच्छेदन केले. त्यात यकृतातील बिघाडामुळे बेबी पेंग्विनचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याची माहिती प्राणिसंग्रहालयाकडून देण्यात आली आहे.
अंडी व पिल्ले मृत होण्याचे प्रमाण ६० टक्के -
पेंग्विन व्यवस्थापनावरील विविध संदर्भानुसार, बऱ्याचदा अंडी व पिल्ले मृत होण्याचे सरासरी प्रमाण ६० टक्के इतके असते. ज्यामध्ये अंडे फलित नसणे, अंड्यामध्ये पिल्लाची स्थिती योग्य नसणे, अंड्यामधून स्वत: पिल्लू बाहेर न येणे, पिल्लाला अन्न भरवण्यासाठी पालक पक्ष्यांची असमर्थता, अंड्यातील पिवळा बलक तसाच राहणे, ॲल्युमिनचा साका तयार होणे आदी विविध कारणे/बाबी कारणीभूत असतात. त्याचप्रमाणे असोसिएशन ऑफ झूज अँड ॲक्वेरिअम स्पिसिज सव्र्हायवल प्लॅन आणि हंबोल्ट पेंग्विन यांच्या कृत्रिमरीत्या उबवण्यासंबंधी तसेच वाढवण्यासंबंधीच्या शास्त्रीय प्रबंधान्वये ३० दिवस वयाच्या पिल्लांचा मृत्यूदर ३० ते ३५ टक्के इतका असल्याचे दिसून येते.